काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली उंच माझा झोका ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली. रमाबाई रानडे यांचा जीवन प्रवास या मालिकेतून दाखवण्यात आला होता. कमी वेळातच ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली होती. या मालिकेतील सगळ्या कलाकारांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.
‘उंच माझा झोका’ मालिकेत नीना कुलकर्णी, शरद पोंक्षे, कविता लाड, ऋग्वेदी प्रधान, स्पृहा जोशी, विक्रम गायकवाड, शर्मिष्ठा राऊत अशी तगडी स्टारकास्ट होती. रमाबाई रानडे यांची लहानपणीची भूमिका तेजश्री वालावलकर हिने साकारली होती. या मालिकेला बंद होऊन आता बरीच वर्ष उलटली आहेत. दरम्यान तेजश्रीने नुकतेच सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ‘उंच माझा झोका’च्या आठवणींना उजाळा दिला आहे.
तेजश्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहेले “अकरा वर्षांनी पुन्हा एकदा नऊवारी नेसून तयार झाले. तयार झाल्यावर माझ्यासोबत लोकेशनवर असलेल्या प्रत्येकाच्या ओठात उंच माझा झोकाच गाणं आलं आणि ते गुणगुणायला लागले. जणू एकदम ११ वर्ष मागे गेल्यासारखं वाटायला लागलं आणि सर्वांच्या मनात असलेल उंच माझा झोकाच अढळ स्थान आणि प्रेम हे ११ वर्षांनी कदाचित तेवढ्याच किंवा त्या पेक्षा ही जास्त पटीने वाढलंय अस जाणवलं. माझ्यासोबत असलेल्यांनी लगेच दोन्ही व्हिडिओ एकत्र करून हा सुंदर प्रवास टिपला.”
तेजश्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ‘उंच माझा झोका’ मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहचली. मालिकांव्यतरिक्त तेजश्रीने चित्रपटांमध्येही काम केले आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या आजी आणि नातू या चित्रपटात तिने बालकलाकाराची भूमिका साकरली होती. तसेच २०१४ साली प्रदर्शित झालेल्या चिंतामणी या चित्रपटातही तिची महत्वाची भूमिका होती. या चित्रपटात भरत जाधव, अमृता सुभाष यांच्या प्रमुख भूमिका होत्या.