खळखळून हसवणाऱ्या तसेच खलनायकाच्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या मनात त्या पात्रांविषयी चीड निर्माण करणाऱ्या भूमिका साकारत आजवर अभिनेते वैभव मांगले यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

अभिनयाबरोबरच वैभव मांगले हे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांसाठीदेखील ओळखले जातात. नुकतीच त्यांनी अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत पैसा हेच अंतिम सत्य नाही, असे त्यांनी वक्तव्य केले. आता ते नेमकं काय म्हणालेत, हे जाणून घेऊयात…

“उच्च दर्जाचा रसिक होणं हे जास्त कठीण आणि सुंदर गोष्ट आहे”

वैभव मांगले म्हणाले, “माझ्याकडे जो अभिनय आणि गाणं या कला आहेत, या गोष्टी माझ्याकडे वंशपरंपरागत आल्या असाव्यात. कारण माझे आईचे वडील बापू पारिसआण्णा वणकुदरे हे संगीत नाटकांमधून काम करायचे, स्त्री भूमिका करायचे. गायचे. त्यांचे थोरले बंधू होते, ते बाळकृष्ण बुवा इजाऱ्यांकडे दत्तक गेले होते. ते मोठे गवई होते. त्यांच्याकडून गाण्याचा आणि अभिनयाचा गुण माझ्यात आला असावा. आमचे वडीलही गायचे. त्यांना गाण्याची आवड होती. माझ्या वडिलांचे वडील म्हणजेच माझे आजोबा ते गावातील पाऱ्यावरच्या नाटाकातून कामं करायचे. कोकणामध्ये दशावतार वगैरे अशा गोष्टी असतात. तो संस्कार असतो. तो माझ्यामध्ये प्रवाही झालेला असावा.

“गाणं ही भीक मागायची लक्षणं आहेत. त्याने काही होतं का, असा त्याकडे लोकांचा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. मला वाटतं की लोक पैशाभिमुख व्हायला लागले. तर तो काळ असावा की गाणे, नाटक याने पोट भरत नाही. पैसे कमवा आणि सगळं मिळवा, असा पद्धतीने त्याकडे पाहिलं जाऊ लागलं.”

“तुझा गोष्टींकडे किंवा कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे पैशाभिमुख नाही, असं आहे का? यावर वैभव मांगले म्हणाले, “जर मी पू्र्ण पैशाभिमुखच असतो, तर विविध गोष्टी शिकल्या नसत्या. मी आज मुलांनासुद्धा सांगतो की जगण्यासाठी जितका पैसा लागतो, तो तुम्ही नक्कीच कमवा आणि तो जर तुमच्या आवडत्या कामांमधून मिळवता आला तर ते चांगलं आहे.

“कुठली कला जोपासून, जे तुम्हाला काही छंद आहेत, त्यातून तो पैसा मिळवता आला तर त्यासारखं दुसरं भाग्य नाही. पण, माझी मुलांकडून अजिबात अपेक्षा नाही की त्यांनी पैशाच्या मागे धावावं. त्यांनी गरजेपुरता पैसा कमवावा, त्यांनी जग फिरावं, त्यांनी सगळ्या कला शिकाव्यात. माझं तर असं म्हणणं आहे की, कलाकार होण्यापेक्षा कलाप्रेमी होणं, उच्च दर्जाचा रसिक होणं हे जास्त कठीण आणि सुंदर गोष्ट आहे. माझी मोठी मुलगी तर याच मताची आहे की मला छान जगायचं आहे. मला कसलं टेन्शन वगैरे नको आहे, या मताची ती आहे.”

“चांगलं ऐकणं, पाहणं, वाचणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट”

वैभव मांगले पुढे उदाहरण देत म्हणाले, “चांगल्या चित्रकारांची प्रदर्शने पाहिली, चित्रं पाहिली, तर एखाद्या वेळेस ती कला अवगत करण्याचा तू प्रयत्न करणार नाहीस का? कविता वाचता-वाचता, एखादी कविता सुचू शकते. गाणं गाताना हरकती आणि सूर तुझ्या गळ्यात आहेत, हे तुला समजले तर तू गाण्यासाठी प्रयत्न करशील. म्हणजेच एखाद्या चांगल्या श्रोत्यामधून एखादा चांगला कलाकार निपजण्याची शक्यता आहे. ते कदाचित लाखातून एखाद्या वेळेस घडेल, पण चांगलं ऐकणं, पाहणं, वाचणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.”

“नाटकातला दर्दी प्रेक्षक जोपर्यंत समोर आहे, तोपर्यंत कलाकार चांगलं काम करत राहणार आहे. चांगलं वाचणारे आहेत, अभिप्राय देणारे आहेत, चर्चा करणारे आहेत; तोपर्यंत लोकं चांगलं लिहित राहणार आहेत. आज समाजामध्ये नेमकं तेच हरवत चाललं आहे, कारण आपण लोकांना, मुलांना फक्त पैसा कमविण्यासाठी जे काही करावं लागेल ते करा, हाच संस्कार आणि हीच मूल्यं शिकवतोय”, असे म्हणत वैभव मांगले यांनी त्यांचे विचार मांडले.