टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येनंतर संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. तिचे कुटुंबियही अद्याप या धक्क्यातून सावरलेले नाहीत. १६ ऑक्टोबर रोजी वैशालीने इंदौरमधील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. घटनास्थळी मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये वैशालीचा शेजारी राहुल नवलानीचं नाव समोर आलं आहे. राहुल नवलानी मागच्या दोन- अडीच वर्षांपासून वैशालीला त्रास देत होता. वैशालीने राहुलच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं आपल्या सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. अशातच वैशालीचा सह- अभिनेता निशांत सिंहनेही आता या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून वैशालीबरोबर घडत असलेल्या या घटनांची त्याला कल्पना होती असं त्याने म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निशांत सिंह मलकानीने ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत वैशाली ठक्करबद्दल बरेच खुलासे केले आहेत. निशांतने सांगितलं की वैशालीला होत असलेल्या त्रासाची त्याला कल्पना होती आणि आता तो याबाबत सर्व गोष्टी पोलिसांना सांगून वैशालीच्या कुटुंबियांच्या शक्य ती सर्व मदत करणार आहे. वैशाली तिच्या लग्नाबाबत खूपच उत्साही होती आणि तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटोही आपल्याला दाखवल्याचं निशांत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. एवढंच नाही तर तिने राहुल नवलानीबद्दलही निशांतला सांगितलं होतं.

आणखी वाचा- “त्यांनी मला हॉटेलमध्ये बोलवलं अन्…” कास्टिंग काऊचबद्दल बोलताना नीना गुप्ता यांनी केला देव आनंद यांचा उल्लेख

निशांत सिंह मलकानी म्हणाला, “वैशाली माझी खूप चांगली मैत्रीण होती. जेव्हा मी ही बातमी ऐकली तेव्हा मलाही धक्का बसला. पहिल्यांदा वाटलं की काही अपघात झाला असेल. पण जेव्हा तिने आत्महत्या केल्याचं कळलं तेव्हा मी खरंच हादरलो. एका आठवड्यापूर्वीच माझं आणि वैशालीचं बोलणं झालं होतंत. तेव्हा तिने मला तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगितलं होतं आणि त्याचा फोटो दाखवला होता. त्यावेळी तिने मला विनंती केली होती की हा फोटो मी कोणालाच दाखवू नये. ती खूप खुश होती. तिने मला लग्नालाही बोलवलं होतं. नोव्हेंबरमध्ये तिचं लग्न होणार होतं. त्यामुळे तिचं असं अचानक जाणं खूपच धक्कादायक होतं.”

आणखी वाचा-अभिनेत्री वैशाली ठक्करची शेवटची इच्छा पूर्ण, आईला म्हणाली होती…

निशांत पुढे म्हणाला, “वैशालीने ‘रक्षा-बंधन’ मालिकेत माझ्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारली होती. त्यावेळी आम्ही एकमेकांशी खूप बोलायचो, गप्पा मारताना बऱ्याच गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या होत्या. त्यामुळे मला त्या माणसाबद्दल सर्व काही माहीत होतं. तिला राहुल नवलानी त्रास देत होता त्याबद्दल सर्वकाही माहीत होतं. तिने मला बरंच काही सांगितलं होतं आणि तिचा माझ्यावर विश्वास होता. त्यामुळे माझं कर्तव्य आहे की मी तिचं खासगी आयुष्य कोणाशी शेअर करू नये. पण आता त्याच व्यक्तीमुळे वैशालीने एवढा मोठा निर्णय घेतला. तर मी देखील माझे शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहे. त्याच्या विरोधात लढणार आहे. पोलिसांना शक्य ती सर्व मदत करायला मी तयार आहे. राहुलबद्दल मला वैशालीने सांगितलेल्या सर्व गोष्टी मी सविस्तरपणे पोलिसांना सांगणार आहे.”

वैशाली ठक्करने तिच्या सुसाइड नोटमध्ये राहुल नवलानीच्या नावाचा उल्लेख केला होता. राहुल तिला मागच्या अडीच वर्षांपासून शारीरिक आणि मानसिकरित्या त्रास देत असल्याचं तिचं म्हणणं होतं. त्याने जे काही केलं होतं त्याचा अंदाज लावणंही कठीण असंही वैशालीने तिच्या सुसाइड नोटमध्ये म्हटलं होतं. या सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी राहुल नवलानीला अटक केली आहे. तसेच त्याच्या पत्नीच्या विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र त्याची पत्नी सध्या फरार झाली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaishali takkar suicide case actress co actor nishant singh open up about rahul navlani mrj