Vaishnavi Kalyankar Talk’s About Mother In Law : लग्नानंतर तसेच लग्नाआधीसुद्धा बऱ्याचदा स्त्री कलाकारांना इंडस्ट्रीत काम करताना घरच्यांकडून किंवा सासरच्या मंडळींकडून तितकासा पाठिंबा मिळत नाही, असं काहीवेळा अभिनेत्रींकडून ऐकायला मिळतं. अशातच आता लोकप्रिय अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिने याबाबत सांगितलं आहे.

वैष्णवी कल्याणकर सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यादरम्यान तिने दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल तसेच नुकतंच सुरू झालेल्या संसाराबद्दल सांगितलं आहे. वैष्णवीने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली असून यामध्ये तिने तिच्या सासुबाई म्हणजेच किरण गायकवाडच्या आईबद्दल सांगितलं आहे.

सध्या ‘देवमाणूस’ मालिकेतून चर्चेत असलेले अभिनेता म्हणजे किरण गायकवाड. किरण व वैष्णवी यांनी डिसेंबर २०२४ मध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाला अजून एक वर्षही झालं नाहीये. अशातच वैष्णवीने नुकतंच तिच्या सासुबाई शकुंतला गायकवाड यांच्याबद्दल सांगितलं आहे. मुलाखतीत तिला सासरी सगळं कसं आहे याबाबत विचारण्यात आलेलं.

वैष्णवी कल्याणकरची सासुबाईंबद्दल प्रतिक्रिया

वैष्णवी याबद्दल म्हणाली, “सासरी सगळं छान आहे, सासू छान आहे. या क्षेत्रात काम करण्यासाठी पाठिंबा देत आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं; सगळे खूप छान आहेत, कुटुंब छोटं आहे आणि खूप गोड आहे.

याच मुलाखतीत तिने लग्नानंतरही ‘देवमाणूस’ मालिकेच्या चित्रीकरणामुळे व त्यांच्या कामामुळे ती व किरण लाँग डिस्टन्समध्ये असल्याचं म्हटलं आहे. याबाबत ती म्हणाली, “लग्नानंतर आम्ही थोडाच काळ एकत्र होतो, त्यानंतर ‘देवमाणूस’ सुरू झालं आणि आमचं लाँग डिस्टन्स सुरू झालं. लग्नाआधीही लाँग डिस्टन्स आणि लग्नानंतरही लाँग डिस्टन्स सुरू आहे.” यामध्ये तिला तू संसारात रमलीयेस का, असं विचारलं असताना वैष्णवी म्हणाली, “बऱ्यापैकी रमली आहे, कारण लग्न झाल्यानंतर ४-५ महिने किरण व मी एकत्र राहिलो.”

दरम्यान, वैष्णवीबद्दल बोलायचं झालं तर ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अभिनेत्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. ती अनेकदा तिचे फोटो व व्हिडीओ यावरून शेअर करत असते. वैष्णवी लवकरच ‘घाबडकुंड’ या चित्रपटातून झळकणार आहे. यामध्ये तिच्यासह अभिनेते देवदत्त नागेही झळकणार आहेत.