Navri Mile Hitlerla Fame Vallari Viraj : वल्लरी विराज मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. वल्लरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती या मालिकेतील तिची सहकलाकार व मैत्रीण आलापिनी निसळबरोबर अनेक रील, व्हिडीओ व फोटो पोस्ट करीत असते. वल्लरी खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली ते ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेमुळे. अशातच आता तिनं याबद्दल सांगितलं आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ ही ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका होती. लोकप्रिय अभिनेता राकेश बापट व वल्लरी विराज यांनी त्यामध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने या मालिकेची निर्मिती केलेली. ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका मार्च २०२४ मध्ये सुरू झालेली. वर्षभर प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर २५ मे २०२५ ला या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. अशातच आता वल्लरी विराजनं तिला मालिका बंद होतेय हे कळल्यावर तिची काय प्रतिक्रिया होती याबद्दल सांगितलं आहे.

वल्लरी व तिची आई वैशाली लोंढे यांनी ‘स्पिल द टी विथ सरतापेस’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. वल्लरी ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेबद्दल म्हणाली, “आलापिनीनं मला फोन केला. मी गाडी चालवत होते. ती म्हणाली की, आई-बाबापण आहेत ना बरोबर. मी म्हटलं हो आहेत. तेव्हा १२ वगैरे वाजले होते. ती म्हणाली, “फोन स्पीकरवर ठेव. मला त्यांच्याशीपण बोलायचं आहे.”

वल्लरी विराजची ‘नवरी मिळे हिटलरला’बद्दल प्रतिक्रिया

वल्लरी याबद्दल पुढे म्हणाली, “मी फोन स्पीकरवर ठेवला आणि ती म्हणाली, “शर्मिष्ठामॅम आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की, आपली मालिका आता बंद होतेय. सगळे सांगत होते की, वल्लरीला नको सांगू तिच्या आईचा आज वाढदिवस आहे. पण, मला असं वाटलं की, सेटवर येऊन कळण्यापेक्षा ती तुमच्याबरोबर असताना कळू दे म्हणजे तिला वाईट वाटलं, तर तुम्ही असाल.”

मालिका संपतेय हे कळल्यानंतर वल्लरी निराश झाली होती. याबद्दल ती म्हणाली, “आलापिनीचं बोलणं ऐकून मी सुन्नच झाले होते. एक तर पहिलीच मालिका त्यामुळे ते वेगळंच प्रेम असतं.”