Milind Shinde propose her wife: पुरस्कार सोहळ्यांमुळे मालिकांतील सर्व कलाकारांचे विविध कलागुण प्रेक्षकांना पाहता येतात. आपल्या आवडत्या कलाकारांना रोजच्या भूमिकांपेक्षा वेगळ्या भूमिकेत पाहणे ही प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी असते. विशेष म्हणजे, नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचीदेखील एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळते.

या सगळ्याबरोबर कलाकार अशा पुरस्कार सोहळ्यांमध्ये त्यांच्या खऱ्या आयुष्यातील काही गोष्टी सर्वांना सांगतात. त्यांच्या मनातील हळवा कोपरा सर्वांसमोर उघड करतात. याबरोबरच, अनेक गमतीजमती पाहायला मिळतात. विनोदी कलाकार त्यांच्या सादरीकरणातून प्रेक्षकांना खळखळून हसवतात.

मिलिंद शिंदे यांची ‘देवमाणूस’ मालिकेतील भूमिका

आता ‘देवमाणूस’ मालिकेत इन्स्पेक्टर मार्तंड जामकर ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद शिंदे यांचा एक व्हिडीओ झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला. इन्स्पेक्टर मार्तंड जामकर कायम गंभीर राहणारे, कडक शिस्तीचे, गुन्हेगारांना योग्य शिक्षा देणारे, गुन्हेगारांमध्ये त्यांची जरब असणारे असे आहेत. देवमाणूस मालिकेतील इन्स्पेक्टर मार्तंड जामकर ही भूमिका चांगलीच गाजली आहे. अभिनेते मिलिंद शिंदे यांनी ज्या पद्धतीने ती साकारली आहे. त्याचे वेळोवेळी कौतुक होताना दिसते.

आता या कडक शिस्तीच्या गंभीर इन्स्पेक्टर मार्तंड जामकर यांचे रोमँटिक रुप झी मराठीच्या मंचावर पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला मंचावर मिलिंद शिंदे त्यांच्या पत्नी प्राजक्ता यांच्यासह उपस्थित आहेत. अभिजीत खांडकेकर म्हणतो की यांना या रुपात आपण कधीही पाहिलेलं नाहीये. अशा रोमँटिक रुपात इन्स्पेक्टर मार्तंड आपल्या प्राजूला प्रपोज करणार आहेत.

मिलिंद शिंदे थेट मंचावर पत्नीला प्रपोज करणार

व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळते की ते गुडघ्यावर बसतात आणि त्यांच्या बायकोला गुलाब देतात. ते त्यांच्या पत्नीला म्हणतात की तुम्ही माझ्याशी लग्न करणार का? त्यावर त्यांची पत्नी गुलाबाचे फुल घेते आणि होकार देते. त्यानंतर ‘वेड्या मना सांग ना…’ हे ‘मितवा’ चित्रपटातील रोमँटिक गाणे सुरू होते. गाणे सुरू झाल्यानंतर ते त्यावर काही डान्स स्टेप्स करतात. त्यांची पत्नी लाजतानादेखील दिसत आहे. तर गर्दीतील लोक त्यांना ओरडून प्रोत्साहन देत आहेत. तसेच गाणे सुरू असताना त्यांच्यावर फुलांची उधळणदेखील होत आहे.

आता हा व्हिडीओ शेअर करताना झी मराठी वाहिनीने ‘मार्तंड जामकरांवर चढणार रंग प्रेमाचा’, अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत मिलिंद शिंदे यांचे कौतुक केले आहे. “आम्ही देवमाणूस मालिका यांच्यामुळेच बघतो. हे खूप भारी काम करतात”, “गंमत अशी गंमत करत असतो मी अधून मधून”, “मिलिंद सर, अप्रतिम माणूस आहे”, “देवमाणूस मालिका एकदम भारी तुमची भूमिका लयभारी”, “अभिनय उत्कृष्ट आहेच, कलाकार म्हणुन भारीच आहेत. पण माणूस म्हणून अप्रतिम आहेत. सर सलाम तुम्हाला”, “तांबडे बाबा”, “वाह! सर्वांसाठीच आश्चर्याचा सुखद धक्का”, अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

आता या पुरस्कार सोहळ्यात आणखी काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हा झी मराठीचा हा पुरस्कार सोहळा ११ व १२ ऑक्टोबरला प्रेक्षकांना पाहता येणार आहे.