Kamali Upcoming Twist: कमळी आणि अनिका यांच्यामध्ये सतत काही ना काही घडताना दिसते. अनिका कमळीला त्रास देण्यासाठी विविध कट-कारस्थाने करीत असते; तर कमळी सत्याचा मार्ग निवडते आणि समोर आलेल्या संकटातून मार्ग काढत पुढची वाटचाल करीत असते.
कमळीच्या या लढाईत अन्नपूर्णाआजी, हृषी व निंगी कायमच तिची साथ देताना दिसतात. संकटाच्या काळात ते तिच्यापुढे मदतीचा हात पुढे करतात. आता मात्र कमळीच्या मदतीला एक खास व्यक्ती धावून आली आहे.
झी मराठी वाहिनीने कमळी या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, कमळी व तिचे वर्गमित्र मिळून काम करीत आहेत. कमळी म्हणते, “आज आपण पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जे काही शक्य होईल, ते सगळं गोळा करतोय”, हे म्हणत असताना तिच्या हातात एक बॉक्स दिसत आहे. तितक्यात एक मुलगा येतो आणि तो बॉक्स हवेत उडवतो. त्यादरम्यान तिथे एका व्यक्तीची एन्ट्री होते आणि ती व्यक्ती तो बॉक्स झेलते.
ती म्हणते, “जेव्हा जेव्हा त्या शेतकऱ्यांवर संकट येईल, तेव्हा तेव्हा मी असाच येईन.” ती व्यक्ती समोर येते आणि त्या मुलाच्या कानाखाली मारून, कमळीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणते की, आम्हाला तुझा अभिमान वाटतोय. कमळी विचारते, “तुमचं नाव काय?”, त्यावर ती व्यक्ती म्हणते, “शिवाजी शहाजी भोसले.” त्यानंतर कमळी जय भवानी, अशी घोषणा देते. तिच्या चेहऱ्यावर अभिमान दिसतो.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, कमळीच्या मदतीच्या धावून येणार ‘शिवाजी शहाजी भोसले’, अशी कॅप्शन लिहिली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
आता हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत प्रोमोचे कौतुक केले आहे.”जेव्हा शिवाजी शहाजी भोसले असे नाव घेतले, त्यावेळी अंगावर काटा आला. जय शिवराय”, “जय शिवराय”, “हा प्रोमो पाहिल्यानंतर अंगावर काटा आला”, “जय शिवराय, हर हर महादेव”, “जय भवानी”, अशा काही कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
महेश मांजेरकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये शिवाजी शहाजी भोसले या भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ बोडके दिसणार आहे. सध्या चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे. त्यानिमित्ताने कमळी या मालिकेत चित्रपटातील भूमिकेत सिद्धार्थ पाहायला मिळत आहे. हा चित्रपट ३१ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
