Kamli Serial Promo Released At Times Square : सध्या मराठी टेलिव्हिजनवर विविध कथानक असलेल्या मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘कमळी’ ही मालिका. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता या मालिकेसंदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

अभिनेत्री विजया बाबर व निखिल दामले यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या मालिकेनं इतिहास रचला असल्याचं ‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करीत म्हटलं आहे. या वाहिनीच्या सोशल मीडिया पेजवर ‘कमळी’ मालिकेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये ‘कमळी’चा प्रोमो चक्क न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकत असल्याचं पाहायला मिळतंय.

‘कमळी’ मालिकेने रचला इतिहास

वाहिनीने हा व्हिडीओ शेअर करीत त्याला खास कॅप्शनही दिली आहे. मालिकेच्या या व्हिडीओखाली “‘कमळीने रचला इतिहास! मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच एका मालिकेचा प्रोमो अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरवर झळकवण्यात आला आहे” अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनीसुद्धा कमेंट्स करीत आनंद व्यक्त केल्याचं दिसतं.

अमेरीकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर मालिकेचा प्रोमो झळकणं ही मोठी गोष्ट असून, पहिल्यांदाच टाइम्स स्क्वेअरवर एका तरी मराठी मालिकेचा प्रोमो झळकताना पाहायला मिळत आहे. ‘कमळी’ ही मालिका जून महिन्यात सुरू झाली होती. मात्र, अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

‘कमळी’ मालिकेत सध्या कमळी व अनिका या दोघी कबड्डीच्या स्पर्धेसाठी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळतं. कमळीच्या संघानं या स्पर्धेत जिंकू नये म्हणून तिचं अपहरण केलं जातं. परंतु, ती शेवटी तारीणीच्या मदतीनं स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचतेच, असं मालिकेत पाहायला मिळालं आहे. पण, कमळीचं अपहरण झाल्यानंतर ती तिथून स्वत:ची सुटका कशी करते आणि स्पर्धेच्या ठिकाणी कसं पोहोचते तसेच तारीणी कमळीला यातून कसं सोडवते आणि कमळी या स्पर्धेत बाजी मारणार का हे पाहणं रंजक ठरेल.