Nitish Chavan Shares Photo: पडद्यावरचे कलाकार हे मालिका, चित्रपट, वेब सीरिज या माध्यमांतूनच प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. याचबरोबर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात असतात.

अभिनेता नितीश चव्हाण हा टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘लागिर झालं जी’ या मालिकेतून अभिनेता घराघरांत पोहोचला. या मालिकेतील भूमिकेचे आजही कौतुक होताना दिसते. शीतल व अज्याची जोडी लोकप्रिय ठरली होती. सध्या अभिनेता झी मराठी वाहिनीच्या ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे.

लाखात एक आमचा दादा‘ मालिकेत अभिनेत्याने सूर्या ही भूमिका साकारली आहे. चार बहि‍णींवर जीवापाड प्रेम करणारा, संपूर्ण घराला सांभाळणारा, लहान वयात घराची संपूर्ण जबाबदारी घेणारा सूर्या दादा प्रेक्षकांची मने जिंकून घेतो. बहि‍णींसाठी तो अनेकदा संकटांना सामोरे जाताना दिसतो. आता असेच काहीसे मालिकेत पाहायला मिळत आहे.

मालिकेत सूर्याची बहीण तेजूला कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे. त्याचदरम्यान, सूर्यादेखील बहिणीसाठी मंदिरात देवीसमोर तांडव करताना दिसत आहे. यावेळी सूर्याने जी वेशभूषा केली आहे, ती लक्षवेधी ठरत आहे. त्याचा हा लूक चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर त्याच्या या लूकचे फोटो शेअर केले आहेत.

शस्त्र मेरा श्रृंगार…

अभिनेत्याने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये त्याने साडी नेसली आहे. हातात बांगड्या, गळ्यात मोठे हार, नाकात नथ, कानात झुमके, कपाळाला कुंकू आणि चेहऱ्यावर रुद्र भाव दिसत आहे. एका फोटोत त्याने देवीसमोर पदर पसरल्याचे दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोत नटराजची मुद्रा करताना दिसत आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या या फोटोंतील त्याचे भाव चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याचा हा लूक पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या लूकसारखा दिसत आहे. हे फोटो शेअर करताना अभिनेत्याने, “शस्त्र मेरा श्रृंगार है, वीरता मेरा धर्म। मैं भवानी हूँ, युद्धभूमि की रानी।”, अशी कॅप्शन दिली आहे.

नितीश चव्हाणने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. तसेच कलाकारांनी त्याचे कौतुक केल्याचेदेखील दिसत आहे. तितिक्षा तावडेने इमोजी शेअर करत आनंद व्यक्त केला. पूर्वा कौशिकनेदेखील हार्ट इमोजी शेअर केल्याचे पाहायला मिळाले. तसेच, मालिकेत तेजू ही भूमिका साकारणारी अभिनेत्री कोमल मोरेनेदेखील इमोजी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.

काही नेटकऱ्यांनी पुष्पाची कॉपी केल्याचे म्हटले आहे, तर काहींनी त्याचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “भावा, मराठी मातीने जन्म दिलेला कलाकार आहेस, मराठी म्हणून अभिमान वाटतो की आपले कलाकार अप्रतिम आहेत”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “एकच वादा सूर्या दादा”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “पुष्पा २”, असे म्हणत चाहत्यांनी कौतुक केले आहे.

दरम्यान, मालिकेत आता पुढे काय होणार, तेजूचा खरेपणा जिंकणार की शत्रू खोटेपणा करीत विजय मिळवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.