Lakhat Ek Aamcha Dada Fame Komal More shares emotional post: आवडत्या मालिका संपल्या की, प्रेक्षकांना पुढचे अनेक दिवस वाईट वाटत राहते. दररोज दिसणारी पात्रे, त्यांच्या आयुष्याच्या येणाऱ्या अडचणी, आनंद-दु:खाचे प्रसंग या सगळ्यांशी प्रेक्षक समरूप होताना दिसतात. प्रेक्षकांबरोबरच मालिकेत काम करणारेदेखील ते काम करीत असलेल्या मालिकेला निरोप देताना भावूक होतात.
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेने घेतला निरोप
अनेकदा कलाकार त्यांच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करतात. आता ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
सूर्यादादा आणि त्याच्या राजश्री, तेजश्री, धनू, भाग्या या चार बहिणी, प्रेमळ पत्नी तुळजा, सतत कट कारस्थान करणारे डॅडी व शत्रू, वर्षानुवर्षे अन्याय सहन करणाऱ्या शालन-मालन, डॅडींच्या कारस्थानामुळे कित्येक वर्षे तुरुंगवास भोगणारी आणि मुले व कुटुंबापासून दूर गेलेली आशा म्हणजेच सूर्याची आई, बायको पुजाऱ्याबरोबर पळून गेल्याचे समजल्यानंतर व्यसनामध्ये स्वत:ला गुंतवणारे तात्या, वेळोवेळी सूर्याला मदत करणारे त्याचे जीवाभावाचे मित्र काजू व पुड्या ही आणि मालिकेतील इतर पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
मालिकेच्या शेवटच्या भागात डॅडींना त्यांच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा मिळाली आणि सूर्या व त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला. भाऊ व बहिणी यांच्यातील निखळ व प्रेमळ अशा नातेबंधनाने सूर्या व त्याच्या बहिणींनी कायमच प्रेक्षकांची मने जिंकली. आता अभिनेत्री कोमल मोरेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कोमलने मालिकेच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचे सहकलाकारदेखील दिसत आहेत. तसेच मालिका ज्या ठिकाणी शूट केली जात होती, ती जागा आता रिकामी असल्याचे पाहायला मिळत आहे. एका व्हिडीओमध्ये ती रडत असल्याचेदेखील पाहायला मिळत आहे. ही पोस्ट शेअर करीत कोमलने लिहिले, “मला वाटतंय की, आता अधिकृतपणे निरोप घेण्याची वेळ आली आहे. सर्वप्रथम तेजूला इतका पाठिंबा दिला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.”
“तू कायमच माझा लाखात एक दादा…”
अभिनेते गिरीश ओक यांना टॅग करीत तिने लिहिले, “तुम्ही प्रेमळ व्यक्तींपैकी एक आहात. संपूर्ण शूटिंगदरम्यान तुम्ही ज्या पद्धतीनं पाठिंबा दिला, त्याबद्दल धन्यवाद. तुमचे कामाप्रतिचे समर्पण पाहून मला प्रेरणा मिळाली आहे.” नितीश चव्हाणला टॅग करीत तिने लिहिले की, तुझ्यामध्ये मला एक मित्र आणि भाऊ सापडला. तुझ्या ऊर्जेमुळे हा प्रवास १० पटींनी मजेशीर झाला. तू कायमच माझा लाखात एक दादा राहशील. किरण दळवींना टॅग करीत लिहिले की, मला मार्गदर्शन केल्याबद्दल आणि तेजू बनण्यास मला मदत केल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
पुढे कोमलने मालिकेतील इतर सहकलाकारांना टॅग करीत लिहिले की, इतर सर्व कलाकार ज्यांनी हा प्रवास इतका संस्मरणीय बनवला, त्यांचे मनापासून आभार. तसेच झी मराठी वाहिनीप्रतिदेखील कोमलने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
कोमलने चाहत्यांना उद्देशून लिहिले की, आमच्याबरोबर प्रत्येक क्षणी असण्यासाठी थँक्यू! तुमच्या पाठिंब्यामुळे हा प्रवास खास बनला आहे. पुन्हा भेटेपर्यंत सध्या निरोप घेत आहे. कोमलच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत मालिकेची आठवण येईल, असे लिहिले आहे.
दरम्यान, आता या मालिकेतील कलाकार कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.