Lakshmi Niwas fame Harshada Khanvilkar: काही कलाकार हे त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यांच्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करतात. त्यांनी साकारलेल्या भूमिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. इतकेच काय, तर त्यांच्या खऱ्या नावापेक्षा त्यांनी साकारलेल्या पात्राच्या नावाने त्यांना ओळखले जाते.

आता अनेकदा सोशल मीडिया, मुलाखती यांमुळे कलाकार त्यांच्या भूमिकेपेक्षा कसे वेगळे आहेत, ते खऱ्या आयुष्यात कसे आहेत. त्यांचे इतर कलाकारांशी नाते कसे आहे. तसेच इतर कलाकार एखाद्या कलाकाराबाबत काय विचार करतात, हे समोर येते. प्रेक्षकांना त्याबाबत जाणून घेण्याची संधी मिळते.

अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी पुढचं पाऊल, रंग माझा वेगळा व आता लक्ष्मी निवास या मालिकांमध्ये साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत. ‘पुढचं पाऊल’ मधील आक्कासाहेब या भूमिकेने हर्षदा खानविलकर यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. ‘रंग माझा वेगळा’मध्ये त्यांनी साकारलेल्या सौंदर्या इनामदार या भूमिकेला प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले. या दोन्ही भूमिका श्रीमंत, रुबाबदार अशा होत्या. या दोन्ही भूमिकांहून लक्ष्मी ही भूमिका वेगळी आहे.

“त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत…”

सध्या त्यांच्या लक्ष्मी या भूमिकेलादेखील प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळत आहे. या मालिकांमध्ये त्यांच्याबरोबर काम केलेले कलाकार हर्षदा खानविलकर यांचे कौतुक करतात. त्या इतरांसाठी किती गोष्टी करतात, प्रेमाने वागवतात, लाड करतात अशा अनेक गोष्टी सांगतात. तसेच, अनेक कलाकार प्रेमाने त्यांना ‘मम्मा’असेदेखील संबोधतात.

झी मराठी पुरस्कार सोहळा ११ व १२ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. यादरम्यान व्हायफळ पॉडकास्टमध्ये विविध कलाकार सहभागी होत आहेत. त्यांचे अनुभव, त्यांच्या मनातील गोष्टी सांगत आहेत. हर्षदा खानविलकर यांनीदेखील या सेशनमध्ये हजेरी लावली होती.

यावेळी त्यांना विचारण्यात आले की, सगळ्यांच्याच आयुष्यात माणसं असतात. ती टिकवून कशी ठेवावी, ती जोडावी कशी? यावर हर्षदा खानविलकर म्हणाल्या, “ती माणसं टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत. अपेक्षा आपण ठेवतोच; पण त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर माफ करण्याची ताकद असली पाहिजे. कारण- मी जर एकदा प्रेम केलं आहे, तर ते आजन्म आहे.”

अभिनेत्री पुढे असे म्हणाल्या, “या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की, मी माझ्या वडिलांना खूप लवकर गमावलं. माणसं कमावण्याचा जो आशीर्वाद देवानं दिला आहे. तो आशीर्वाद त्यांना खूप होता. आता थोड्या वेळापूर्वी एक व्यक्ती मला भेटली आणि मला म्हणाली की, मी तुमच्या वडिलांचा मित्र आहे. मला दोन-तीन पुरस्कार मिळाले. त्या क्षणी असं वाटलं की, माझे वडील जवळपास आहेत.”

दरम्यान, लक्ष्मी निवास ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत नवनवीन ट्विस्ट येतात. आता आगामी काळात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.