Lakshmi Niwas upcoming twist: ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरताना दिसत आहे. मालिकेत सध्या संतोष, हरीश व मंगल यांना धडा शिकवण्यासाठी लक्ष्मी व श्रीनिवास यांनी रौद्र रुप धारण केल्याचे पाहायला मिळत आहे.

संतोष, हरीश व मंगल हे स्वार्थीपणा करताना दिसतात. स्वत:चा विचार करणारे, पैशांसाठी काहीही करायला तयार असणारे, घरच्यांना वेठीस धरणारे, दुसऱ्यांना सतत पैशांसाठी सुनावणारी अशी ही बहीण-भाऊ दुसऱ्यांना सतत त्रास देत असतात. त्यांना त्यांची चूक समजावी, यासाठी लक्ष्मीने कडकलक्ष्मीचा अवतार धारण केला होता, तर श्रीनिवासने रौद्र रूप धारण केले होते.

सिद्धू भावनाला साथ देणार

याबरोबरच, सिद्धू व भावनाचे लग्न झाल्यानंतर सिद्धूच्या घरचे भावनाला त्रास देत असल्याचे दिसत आहे. मात्र, सिद्धू वेळोवेळी भावनाच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. तो तिच्याआधी सर्वांना सामोरे जातो. तिला कमी त्रास व्हावा यासाठी प्रयत्न करताना दिसतो. आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सिद्धूची आई, आजी आणि बहीण भावनाला कामावर जाण्यापासून अडवतात. त्यावेळी सिद्धू भावना मॅडम कामावर जातील, हे स्पष्टपणे सांगतो. त्यामुळे भावना व सिद्धू यांची केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

जयंत नेमके काय करणार?

दुसरीकडे जयंतचा विकृतपणा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जान्हवीवर जयंतचे अतोनात प्रेम आहे. पण, तो त्याचा अतिरेक करताना दिसतो. जान्हवीच्या आयुष्यात तो असावा आणि तो सोडून तिने इतर कोणालाही महत्त्व देऊ नये, त्यांच्याशी बोलू नये, प्रेम करू नये, इतरांसाठी तिने काहीही करू नये असे त्याला वाटते. जे जान्हवीच्या जवळ जातात त्यांना जयंत इजा पोहोचवतो. आता जान्हवीने जयंतचा भूतकाळ काय होता, हे जाणून घेण्याचा निर्धार केला आहे.

झी मराठी वाहिनीने ‘लक्ष्मी निवास‘ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की जान्हवी घरात नाही. जयंत देवासमोर हात जोडून रडत आहे. तो रडत देवाला म्हणतो, “देवा, मी तिच्यावर प्रचंड प्रेम केलं, पण ती मला सोडूनच गेली.” पुढे जयंतने जान्हवीचे कटआऊट तयार करून घेतल्याचे दिसत आहे. प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, जयंत जान्हवीच्या कटआऊटबरोबर बोलत आहे. तो जिथे जाईल तिथे तो ते कटआऊट घेऊन जात आहे. त्या कटआऊटचे केस विंचरतानादेखील तो दिसतो. तसेच तो म्हणतो, “मला खात्री आहे की तू मला सोडून कधीच कुठेही जाणार नाहीस.”

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने जयंतचं प्रेम घेणार धक्कादायक वळण, अशी कॅप्शन दिली आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. “जान्हवी आणि मॅडची जोडी चांगली आहे”, “या अभिनेत्याने ही भूमिका उत्तम साकारली आहे. त्याच्याबद्दल प्रेम वाटतं, राग येतो आणि दयासुद्धा वाटचे. खूप विविध छटा असलेले हे पात्र आहे”, “किती सायको दाखवला आहे”, “खरा मॅड तर हा आहे”, अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.