Savalyachi Janu Savali And Paaru Upcoming Twist: काही दिवसांपासून सावळ्याची जणू सावली व पारू या मालिकांचा महासंगम पाहायला मिळत आहे. या महासंगममध्ये अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत
एका मुलीच्या खुनाच्या आरोपाखाली आधी आदित्यला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांनी सारंगला अटक केली. विशेष म्हणजे सारंगची केस घेण्यासाठी कोणताही वकील तयार नव्हता. यावेळी कालिंदी धर्माधिकारी सारंगच्या मदतीला धावून आल्या. सारंगला अटक झालेली असताना सारंग व सावली यांना वेगळे करता येईल, सारंगची कंपनी स्वत:च्या ताब्यात घेता येईल असा विचार शिवानी करीत होती. आता मालिकेत पुन्हा एकदा ट्विस्ट आला आहे.
‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
झी मराठी वाहिनीने या महासंगमाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते, “सारंगच्या विरोधात असलेले वकील म्हणतात की, कोर्टात काय चालू आहे? इथे आरोपीच नाही. माझी खात्री आहे सारंग मेहेंदळे यांनीच खून केलेला आहे. जो माणूस खून करू शकतो, तो पळूही शकतो. दुसरीकडे पाहायला मिळते की, सारंगला घेऊन येणाऱ्या पोलिसांच्या गाडीवर काही गुंड हल्ला करतात. ते पोलिसांना मारतात.
सारंगला घडणाऱ्या गोष्टींची काहीच कल्पना नसल्याने तो गोंधळून जातो. ते गुंड सारंगलादेखील मारण्यासाठी येतात. त्यावेळी त्याला वाचवणारा एक हात पुढे येतो; तर दुसरीकडे सावली विठ्ठलापुढे प्रार्थना करीत असते. ती देवासमोर दिवा लावते. तो दिवा विझत असताना, तो विझू नये यासाठी तिला कोणीतरी मदत करण्यासाठी पुढे येते. आता सारंग व सावलीला मदत करणाऱ्या व्यक्ती नक्की कोण असतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘सारंग वेळेवर कोर्टात पोहोचू शकेल का?’, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, काही दिवसांपूर्वीच सारंगच्या कंपनीने बनविलेल्या एका क्रीममुळे चेहरा खराब झाल्याची तक्रार एका मुलीने केली होती. तसा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. सोशल मीडियावर अशा पद्धतीचा व्हिडीओ पाहून सारंगला संताप आला होता. तो त्या मुलीशी बोलण्यासाठी गेला होता. जेव्हा तो तिच्या घरी पोहोचला. तेव्हा त्या मुलीचा आधीच खून झालेला होता. तिचा मृतदेह कपाटात ठेवला होता. जेव्हा त्याने कपाट उघडले तेव्हा तो मृतदेह त्याच्या अंगावर पडला आणि त्याच्या कपड्यांवर मृतदेहाच्या रक्ताचे डाग उमटले.
त्याचदरम्यान आदित्यदेखील तिथे फूड डिलिव्हरी करण्यासाठी गेला होता. त्यामुळे पोलिसांनी पहिल्यांदा आदित्यला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांना कोणताही पुरावा सापडला नाही. त्यामुळे त्यांनी त्याला सोडले आणि सारंगला अटक केली. आता सारंगविरुद्ध न्यायालयात खटला दाखल झाला आहे. आता या सगळ्यातून सारंग कसा बाहेर पडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.