Savalyachi Janu Savali and Paaru Upcoming Twist:‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील सतत काहीतरी नवीन घडताना दिसते. या मालिकेतील सावली, सारंग, जगन्नाथ, तिलोत्तमा अशी सगळीच पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात.

सावली ही गरीब घरची, सावळ्या रंगाची मुलगी आहे. तिचे लग्न अशा घरातील मुलाशी होते, जिथे गोऱ्या रंगाला मोठ्या प्रमाणात महत्व दिले जाते. त्यामुळे लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत सावलीला खूप त्रास सहन करावा लागला. मात्र, हळूहळू तिने सर्वांची मने जिंकली.

आता काही दिवसांपूर्वी मालिकेत शिवानीची एन्ट्री झाली आहे. शिवानीला सारंग तिच्या आयु्ष्यात हवा आहे. सारंग व सावलीचे लग्न झाल्याचे माहित असूनही शिवानी सारंगला सावलीपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी ती ऐश्वर्याची मदत घेत आहे. विविध कट कारस्थाने करत ती सावली व सारंग यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आता या सगळ्यात सावली मात्र खंबीरपणे तिच्यासमोर उभी आहे. तिने शिवानीला तिच्या संसारात ढवळाढवळ करू नये, अशी ताकिदही दिली आहे.

दुसरीकडे पारू मालिकेतदेखील मोठा ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळाले. पारू व आदित्यचे जेव्हा आधीच लग्न झाले आहे, हे जेव्हा अहिल्यादेवीला समजले. तेव्हा तिला विश्वासघात केला आहे, असे वाटले. याच भावनेतून तिने पारूला सून मानण्यास नकार दिला आणि पारू व आदित्यला घराबाहेर काढले.

अहिल्यादेवीने घराबाहेर काढल्यानंतर पारू व आदित्य खडतर परिस्थितीतून मार्ग काढत त्यांचा नवीन संसार उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्यात दिशाला किर्लोस्करांना धडा शिकवण्याची तिची योजना यशस्वी झाल्याचे वाटत आहे.

‘पारू’ व ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकांचा महासंगम

अशातच आता पारू आणि सावली एकत्र येऊन त्यांच्या अस्तित्वाची परीक्षा देणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहेत. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे.

या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की पारू आणि सावळ्याची जणू सावली मालिकेचा महासंगम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रोमोमध्ये सावली म्हणते, कितीतरी कठीण प्रसंगांना तोंड दिलं आहे. पारू म्हणते जीवाची पर्वा न करता सर्वकाही केलंय. यादरम्यान सावली आणि पारू या त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांना त्यांनी आत्मविश्वासाने सामोरे केल्याचे काही क्षण दिसतात. त्यानंतर पारू सावलीला म्हणते की या अस्तित्वाच्या लढाईत आपणच एकमेकांची ताकद आहोत.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “पारू आणि सावली एकत्र येऊन लढणार अस्तित्वाची लढाई”, अशी कॅप्शन दिली आहे.

या दोन्ही मालिकांचा महासंगम १३ ते १९ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता या महासंगमध्ये नेमकं काय घडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.