काही मालिका या त्यातील पात्रांमुळे लोकप्रिय ठरतात. अशाच काही लोकप्रिय मालिकांमध्ये शिवा या मालिकेचे नाव घेतले जाते. या मालिकेतील फक्त शिवाच नाही तर तिची पाना गँगदेखील लोकप्रिय आहे.

शिवा आणि पाना गँगच्या मैत्रीची प्रेक्षकांवर भुरळ आहे. काही दिवसांपूर्वीच यूपीएसीच्या परीक्षेत रॉकीने यश मिळवले. त्यानंतर शिवाची नणंद संपदा आणि रॉकीचा साखरपुडा ठरला. या साखरपुड्यासाठी शिवा रॉकीला आणण्यासाठी गेली होती, पण सुहासने शिवाविरुद्ध कट रचला.

शिवाला मारण्याची त्याने योजना आखली. मात्र, या सगळ्यात रॉकीला त्याचा जीव गमवावा लागला. आता सुहास व त्याची आई शिवाला एकटे पाडण्याची आणि तिला जीवे मारण्याची योजना आखत असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

“शिवाचासुद्धा नंबर लागणार”

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, रॉकीचे अंत्यसंस्कार सुरू आहेत. शिवा त्याचे अंत्यविधी करत आहे. शिवाचे कुटुंब तसेच पाना गँग भावूक झालेले दिसत आहेत. संपदा रडत आहे, तर शिवाच्या चेहऱ्यावर दु:ख पाहायला मिळत आहे. याचदरम्यान सुहास त्याच्या आईला म्हणतो, “आई, शिवा पुन्हा एकदा वाचली.” त्याची आई म्हणते, “ती वाचली खरी, पण तिचा तो प्यादा उडाला. एकेक करून तिचे सगळे प्यादे उडवायचे. शिवाचासुद्धा नंबर लागणार.”

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सुहास शिवाला एकटं पाडण्यात यशस्वी होईल का?”, अशी कॅप्शन दिली आहे.

आता मालिकेचा हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, ” शिवाला माहीत झाल्यावर सुहासचं काही खरं नाही”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “शिवाने लवकर यांचं सत्य बाहेर आणावं. रॉकीबरोबर खूप वाईट झालं. कालचा एपिसोड रडवणारा होता.”

आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “याची काय गरज होती? लवकर सुहासचं सत्य सर्वांना कळायला हवं”, “रॉकीला का मारलं”, “रॉकीची एक्झिट धक्कादायक होती”, “रॉकीला असं दाखवायला नको होतं. एकतर तो अनाथ होता”, “रॉकीचा मृत्यू दाखवायची काही गरज नव्हती. गरिबीतून शिक्षण घेऊन नोकरी लागली. त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होत आहे, असं वाटत असताना मालिकेने माती खाल्ली”, अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, आता सुहासच्या कारस्थानामुळे रॉकीला जीव गमवावा लागल्याचे सत्य शिवाला कधी समजणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.