Tarini Upcoming Twist: टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिकांतील गोष्ट ही प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी असते. मालिकेतील गोष्ट फक्त एकाच पात्राभोवती फिरत नाही, त्यामध्ये अनेक पात्र पाहायला मिळतात.
त्यांच्या भाव-भावना, त्यांचे संबंध अशा विविध टप्प्यांतून जाताना दिसतात. गोष्ट वेगवेगळ्या पात्रांच्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला मिळते, त्यामुळे प्रेक्षक मालिकेतील गोष्टींमध्ये गुंतून जातात.
आता तारिणी या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून निशीच्या लग्नाची घाई-गडबड दिसत आहे. निशी व कौशिकीचा भाऊ युवराज यांचे लग्न ठरले आहे. तारिणी या लग्नाच्या विरोधात असली तरी तिच्या हातात युवराजच्या विरोधात ठोस पुरावे नाहीत, त्यामुळे ती हे लग्न मोडू शकली नाही. आता तारिणी युवराजचा खरा चेहरा सर्वांसमोर कधी आणणार आणि केदारला त्याचे वडील कधी सापडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
‘तारिणी’ मालिकेत पुढे काय घडणार?
आता युवराजच्या वडिलांना तेच केदारचे वडील आहेत हे समजणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की केदारच्या घरी युवराजचे वडील केदारच्या खोलीत येतात. ते त्याचे कौतुक करत म्हणातात की घर अगदी नीटनेटकं ठेवलं आहेस. तो त्यांचे आभार मानतो आणि त्यांना म्हणतो की मी तुमच्यासाठी एक खास पदार्थ केला आहे. तो पदार्थ पाहिल्यानंतर, नारळाच्या वड्या? असे म्हणतात.
त्या खाल्ल्यानंतर ते त्याचे कौतुक करतात. केदार त्यांना सांगतो की मला आईने शिकवलं आहे, तिचीच रेसिपी आहे. तितक्यात त्यांना ठसका लागतो. केदार तप्तरता दाखवत त्यांना पाणी पाजतो. युवराजचे वडील मनातल्या मनात म्हणतात, हा मुलगा किती छान आहे. या मुलाने गेल्या काही दिवसांत माझ्यासाठी जेवढं केलं आहे, तेवढं युवराजने त्याच्या पूर्ण आयुष्यात केलं नाहीये; हा माझा मुलगा असता तर…, असे ते मनातल्या मनात म्हणतात.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, केदार त्याच्या आईचा नवीन फोटो टेबलवर लावतो, त्याला हार घातलेला दिसत आहे. तो युवराजच्या वडिलांना सांगतो, “काका ही माझी आई…”, तो फोटो पाहून युवराजचे वडील आश्चर्याने देवकी असे म्हणतात. त्यानंतर ते मनातल्या मनात म्हणतात की म्हणजे केदार माझा मुलगा आहे? त्यांना धक्का बसल्याचे पाहायला मिळते. हा फोटो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “दयानंद काकांसमोर येणार केदार त्यांचा मुलगा असल्याचे सत्य!”, अशी कॅप्शन दिली आहे.
आता प्रोमोवर मालिकेत कौशिकीच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिज्ञा भावनेदेखील कमेंट केली आहे. आता मजा येणार, असे तिने लिहिले आहे. तर काही नेटकऱ्यांनी वाह, छान, पुढे मालिका बघायला मजा येणार, झी मराठी वाहिनीवरील सर्वात चांगली मालिका अशा कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, आता केदारला त्याचे वडील दयानंद असल्याचे कधी समजणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
