Veen Doghatli Hi Tutena Upcoming Twist: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिका आता हळूहळू प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करीत असल्याचे दिसत आहे. मालिकेतील समर आणि स्वानंदी त्यांचा स्वभाव, त्यांच्यातील केमिस्ट्री, त्यांच्यातील भांडण, कुटुंबाप्रति असलेल्या प्रेम यांमुळे सर्वांची मने जिंकून घेताना दिसत आहेत.
स्वभाव विरुद्ध असले आणि विचार करण्याची दोघांचीही पद्धत वेगवेगळी असली तरी अनेक गोष्टींमध्ये मतभेद असले तरी या दोघांमध्ये एक साम्य आहे. ते साम्य म्हणजे या दोघांचेही आपल्या भावंडांवर खूप प्रेम असते.
“आम्ही आयुष्यभर तुला…”
स्वानंदीचा भाऊ रोहन आणि समरची बहीण अधिरा यांचे एकमेकांवर प्रेम असून, दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे मतभेद असनूही समर आणि स्वानंदी एकत्र येतात, भेटतात. आता पुन्हा एकदा या दोघांमध्ये मतभेद होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘वीण दोघांतली ही तुटेना’चा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, समरची काकू आणि स्वानंदी एकत्र कारमध्ये बसल्या आहेत. यादरम्यान, काकू स्वानंदीला काही पैसे देत असल्याचे दिसते. काकू स्वानंदीला म्हणते, “समरला हे लग्न होऊ नये, असे वाटत आहे. तू काही कर आणि लग्न मोड. आम्ही आयुष्यभर तुला असे पैसे देत राहू.”
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, स्वानंदी व समर एकमेकांशी फोनवर बोलत आहेत. स्वानंदी समरला जाब विचारत असल्याचे दिसत आहे. स्वानंदी समरला म्हणते, “आम्ही विकाऊ आहोत, असं समजता का तुम्ही?”, त्यावर समर म्हणतो, “हे तुम्ही मला सांगताय?” त्याला उत्तर देत स्वानंदी म्हणते, “मग कोणाला सांगू? काकू आम्हाला पैसे कसे काय ऑफर करू शकतात?”
पुढे समर म्हणतो, “जे मला माहीत आहे, तेच तुम्ही मला सांगत आहात.” यादरम्यान काकू समरला काहीतरी सांगत असल्याचे दिसत आहे. त्यावर स्वानंदी म्हणते, “चूक तुमची आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? त्यावर समर ठामपणे नाही, असे म्हणतो. समरचे बोलणे ऐकल्यानंतर स्वानंदीच्या चेहऱ्यावर चिंता दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘काकू, समर आणि स्वानंदीमध्ये निर्माण करणार गैरसमज’, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “पुन्हा गैरसमज नको”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “आता गैरसमज नको. आतापर्यंत खूप वेळा त्यांच्यात गैरसमज झाला आहे”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्ही दोघे गैरसमज करून घेऊ नका”, एका नेटकऱ्याने लिहिले, “काकूची योजना तिच्यावरच उलटेल. कारण- त्या गैरसमजामुळे ते अधिक जवळ येतील”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “पण यामुळे समर – स्वानंदी अजून जवळ येतील”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
आता समर व स्वानंदीमधील गैरसमज कसा दूर होणार, मालिकेत पुढे काय घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.