Veen Doghatli Hi Tutena Upcoming Twist: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत दररोज काहीतरी नवीन घडताना दिसत आहे. या मालिकेतील स्वानंदीच्या लग्नाची चिंता तिच्या घरच्यांना आहे. कारण- त्यांच्या मतानुसार लग्नाचे वय निघून गेले आहे.
आई-वडिलांची इच्छा आणि तिचा भाऊ रोहनने तिचे लग्न झाल्याशिवाय तो अधिराबरोबर लग्न करणार नाही, ही अट ठेवली होती. त्यामुळे स्वानंदी लग्नासाठी तयार झाली आहे.
सध्या मालिकेत अधिरा आणि स्वानंदीच्या घरी साखरपुड्याची मोठ्या उत्साहात तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आता मात्र या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
स्वानंदीचा साखरपुडा मोडणार अन्…
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर वीण दोघांतली ही तुटेना मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, स्वानंदी व प्रतीक आणि अधिरा व रोहन यांचा साखरपुडा सोहळा सुरू आहे. प्रोमोच्या सुरुवातीला सगळे आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहेत.
सगळे जण डान्सदेखील करीत आहे. समरदेखील त्यामध्ये सहभागी झाला आहे. डान्स करताना प्रतीकमुळे स्वानंदी समरला जाऊन धडकते. समर तिला सावरतो.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, समरची काकू मल्लिका प्रतीकच्या आईला कोणता तरी कागद दाखवते. ते पाहून तिला धक्का बसतो. प्रतीक स्वानंदीला अंगठी घालत असतो. तितक्यात त्याची आई मोठ्याने ओरडते आणि हा साखरपुडा होऊ शकत नाही, असे सांगते.
पुढे ती म्हणते, “यांनी आपल्याला फसवलं आहे. आम्हाला खोटी जन्मपत्रिका दाखवली होती.” आईचे हे बोलणे ऐकून प्रतीकदेखील मला स्वानंदीशी लग्न करायचं नाही, असे सांगतो. तो तिथून निघून जात असताना स्वानंदीचे वडील त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. ते गुडघ्यावर बसतात आणि डोक्यावरचा फेटा काढून, त्याच्या पायावर ठेवतात. लग्न मोडून जाऊ नका, असे रडत सांगतात. पण, तरीही प्रतीक व त्याचे कुटुंब थांबत नाही.
हे सगळं झाल्यानंतर स्वानंदी रोहनला म्हणते, “काय लग्न लग्न म्हणून छळत आहात. तुम्ही सगळ्यांनी जीव नकोसा करून सोडला आहे. थांबा ना. मला माझ्याबद्दल ठरवू द्या ना. आपल्या बाबांचा त्यांनी किती अपमान केला. त्या अपमानापेक्षा हा मोठा निर्णय आहे का? शेवटी स्वानंदी म्हणते, “मला लग्नच करायचं नाहीये”,
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘स्वानंदी निर्णय घेणार, घरासहित वडिलांचा आत्मसन्मान जपणार’, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रोमोचे कौतुक केले आहे. “खूप सुंदर प्रोमो. स्वानंदीने ज्या प्रकारे स्वत:साठी खंबीर भूमिका घेतली, ते आवडले. सध्या झी मराठीवरील ही आवडती मालिका आहे.”, “हाय व्होल्टेज ड्रामा. या भागाची आतुरतेनं वाट पाहत आहोत. नेहमीप्रमाणेच तेजूनं हा सीन उत्तम केला”, “प्रोमोमध्ये तेजूताईचे लूक्स खूप छान आहेत”, “खूप छान”, “तेजश्रीताई मस्त बोलते.”
“तेजश्रीचा अभिनय एक नंबर आहे आणि ती खूप सुंदर दिसतेसुद्धा”, “प्रत्येक मुलीनं असं ठाम उभं राहायला हवं. आपल्या आई-वडिलांचा अपमान यापेक्षा अक्षम्य गोष्ट काहीच नसते आणि असं असेल तर असं लग्न न करणंच बरं. त्याशिवाय प्रत्येक मुलीला स्वतःचं स्वातंत्र्य असतंच. ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.