तेलुगू सुपरस्टार कृष्णा याचे आज (१५ नोव्हेंबर) वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले आहे. काही दिवसांपासून ते श्वसनाच्या त्रासाने त्रस्त होते. या दुखण्यामुळे त्यांना हैदराबादमधील कॉन्टिनेंटल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयामध्येच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत माळवली.
त्यांचे संपूर्ण नाव कृष्णा घट्टामनेनी असे आहे. त्यांनी ३५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते अभिनयासह निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रामध्येही कार्यरत होते. त्यांनी राजकारणामध्येही सहभाग घेतला होता. सुपरस्टार अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या कुटूबांतील बरेचसे सदस्य सिनेसृष्टीमध्ये सक्रिय आहेत. त्यांचा मुलगा महेश बाबू सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. कृष्णा यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ज्यूनिअर एनटीआर, रवि तेजा, चिरंजीवी अशा अनेक सिनेकलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना आदरांजली वाहिली आहे.
‘कृष्णा गारु फार साहसी होते. चित्रपटांमध्ये निरनिराळे प्रयोग करत त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. तेलुगू सिनेसृष्टीच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे’, अशी पोस्ट ज्यूनिअर एनटीआरने शेअर केली आहे.
मेगास्टार चिरंजीवी यांनी ट्वीट करत कृष्णा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कृष्णा यांचा उल्लेख ‘भारतीय सिनेसृष्टीतील अनमोल रत्न’ असा केला आहे.
साई धरम तेज या दाक्षिणात्य अभिनेत्याने त्यांच्या आठवणीमध्ये ‘सुपरस्टार कृष्णा गारु यांच्या जाण्याने सर्वजण दुखी आहोत. देव महेश बाबू आणि त्यांच्या परिवाराला बळ देवो’, अशी पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता नानीनेही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्याने ‘एका युगाचा अंत’ या शब्दांमध्ये त्याने कृष्णा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
‘कृष्णा गारु यांनी आम्हाला सुपरस्टार कसा असतो हे दाखवून दिले होते. माझे वडील त्यांचे खूप मोठे चाहते होते. आता भावना शब्दांमध्ये व्यक्त करणं फार कठीण आहे’, असे म्हणत अभिनेता अल्लारी नरेशने ट्वीट शेअर केले आहे.
आणखी वाचा – ‘पोन्नियन सेल्वन’ फेम अभिनेत्याचे फेसबुक अकाऊंट हॅक, ट्वीट चर्चेत
आंध्रप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनीही सोशल मीडियाद्वारे सुपरस्टार कृष्णा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्या दोघांमध्ये चांगली मैत्री होती.