अनुष्का शर्माच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. ‘फिल्लौरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच अवघ्या काही तासातच सोशल मिडियावर अनेकांनीच या ट्रेलरची प्रशंसा केली. इतकेच नाही तर ‘फिल्लौरी’च्या ट्रेलरमधील अभिनेता दिलजीत दोसांज आणि अनुष्काच्या अभिनयाचीही समीक्षक आणि प्रेक्षकांनीही प्रशंसा केली. पण, सध्या मात्र या चित्रपटासोबत अनुष्का आणि विराट कोहलीच्या बहुचर्चित प्रेमप्रकरणाचेही काही संबंध जोडले जात आहेत. अनुष्काचा प्रियकर विराट कोहलीने या चित्रपटात गुंतवणूक केल्याचे म्हटले जात आहे. पण, अनुष्काने मात्र या सर्व चर्चा धुडकावून लावल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अनुष्काने य़ा चित्रपटाच्या निर्मितीबाबत काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. ‘फिल्लौरी’ हा चित्रपट फॉक्स स्टार एन्टरटेन्मेट आणि क्लिन स्लेट फिल्म्स तर्फे निर्मित करण्यात आला आहे’, असे म्हणत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूत्रांच्या चुकीच्या माहितीला अनुष्काने दोष दिला आहे. अनुष्काला हा सर्व प्रकार काही रुचला नसून तिने तिच्या वक्तव्याद्वारे चुकिची माहिती देणाऱ्या वृत्तपत्रांना, संकेतस्थळांना आणि त्यांच्या चुकीच्या सूत्रांना धारेवर धरले आहे. ‘माझ्या मौनाचा चुकीचा अर्थ काढू नका आणि काहीही न जाणता माझ्या किंवा माझ्या टीमविषयी चुकिची माहिती देऊ नका’, असेही तिने खडसावले आहे.

दरम्यान, पिंकविला या संकेतस्थळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराटला ‘फिल्लौरी’ चित्रपटाची कथा आवडली आणि तो अगदी सुरुवातीपासूनच चित्रपटाच्या कामात सहभाग घेऊ लागला होता. चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी त्याने यात पैसेही गुंतवले आहेत. त्यामुळेच तो स्वतःच्या शैलीत या चित्रपटाची प्रसिद्धी करत आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे या चित्रपटासंबंधीच्या विविध चर्चांना उधाण आले होते.

गेल्या काही दिवसांपासून चित्रपट वर्तुळामध्ये ‘फिल्लौरी’ या चित्रपटाच्याच चर्चा सुरु आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अनुष्काचे वेगळेच रुप पाहता येणार आहे असे म्हणावे लागेल. या चित्रपटामध्ये काहीसा गतकाळही साकारण्यात आल्यामुळे दोन विविध काळांचं दर्शन चित्रपटातून होणार आहे. पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांज आणि अनुष्का शर्मा यांची केमिस्ट्रीही पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is how anushka sharma refuses reports claiming virat kohli produced phillauri