सध्या मराठी चित्रपटसृष्टीमधील कलाकार बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहेत. या यादीमध्ये ‘राझी’, ‘सिंबा’, ‘बाजीराव-मस्तानी’, ‘तान्हाजी’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकलेले कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करण्यातही सफल झाले आहेत. आता ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात देखील मराठमोळा अभिनेता झळकणार असल्याचे समोर आले आहे.

अभिषेक दुधैया यांच्या ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अजयसह संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, परिणीती चोप्रा, राणा दग्गुबती आणि ऐमी विर्क ही दिग्गज कलाकार मंडळी झळकणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. ‘तान्हाजी’ या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेला शरद केळकर आता ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेता राणा दग्गुबती याच्या ऐवजी चित्रपटात शरद केळकरला घेण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राणाने त्याची प्रकृती ठिक नसल्यामुळे चित्रपटातून माघार घेतली आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी त्याच्या जागी शरद केळकरला घेण्याचे ठरवले आहे. शरदने आतापर्यंत अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर त्याची तान्हाजी चित्रपटातील शिवाजी महाराजांची भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीला उतरली. त्यामुळे राणा ऐवजी शरदला चित्रपटात घेतल्याचे म्हटले जात आहे.

१९७१ साली झालेल्या भारत पाक युद्धाची पार्श्वभूमी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. भारत पाक युद्धादरम्यान कर्णिक हे हवाई दलाच्या भूज तळावर नियुक्त होते. हवाई दलाच्या हल्ल्यात भूज तळावरील धावपट्टी उद्ध्वस्त झाली. त्यावेळी कर्णिक यांनी धाडसी निर्णय घेत आजूबाजूच्या गावातील ३०० महिलांकडे तळाची बांधणी करण्यासाठी मदत मागितली होती. त्यांचा हा धाडसी निर्णय आणि हवाई दलाची वाटचाल या चित्रपटात पहायला मिळणार आहे.