अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये काही दिग्गज कलाकारांची नाव समोर आली आहेत. त्यानंतर अलिकडेच ‘हॉण्टेड 3D’फेम अभिनेत्री टिया बाजपेयीने ड्रग्स टेस्ट करुन घेतली आहे. या टेस्टचा रिपोर्ट दियाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबतच तिने अन्य कलाकारांना एक खास संदेशदेखील दिला आहे.

“सगळे सारखे नसतात. त्यामुळे माझ्या कोणत्याही सहकलाकाराला हा डाग स्वत: वर पाडून घ्यायचा नसेल तर त्यांनी ड्रग्स टेस्ट करा. आणि हो, ही टेस्ट केल्यानंतर त्याचा रिपोर्ट सार्वजनिकरित्या सगळ्यांसमोर सांगा”, असं टिया म्हणाली आहे. या सोबतच टियाने एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

“सध्या, काही व्यक्तींनी ड्रग्सचं सेवन केल्यामुळे संपूर्ण कलाविश्वाला बदनाम केलं जात आहे. त्यामुळेच आज मी माझी ड्रग्स टेस्ट केली आहे. हो. मी ड्रग्स टेस्ट करुन घेतली आणि तुम्ही पाहू शकता ही टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना एकच विनंती आहे. प्रत्येक व्यक्तीला एकाच दृष्टीकोनातून नका पाहू. आमच्यातले काही जण खरंच प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि आयुष्यात मोठं होण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं टियाने तिच्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.


पुढे ती म्हणते, “माझी सगळ्या कलाकारांना नम्र विनंती आहे की त्यांनी ड्रग्स टेस्ट करुन घ्या आणि त्याचे रिपोर्ट्स जाहीररित्या सांगा. हे स्वत:साठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या करिअरसाठी करा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या सगळ्या चाहत्यांसाठी करा जे कायम तुमच्यावर प्रेम करतात”.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करताना बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, श्रद्धा कपूर या दिग्गज अभिनेत्रींची नावं समोर आली आहे. या अभिनेत्रींना एनसीबीने समन्स बजावले असून शुक्रवारी,२५ सप्टेंबर रोजी रकुल प्रीतची चौकशी होणार आहे. तर २६ सप्टेंबरला दीपिका पदुकोणची चौकशी होणार आहे.