‘टाइमपास’ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू आणि प्राजूची जोडी आणि त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोरी. पहिल्या भागात प्रेक्षकांच्या मनाला हुरहूर लावून अधुरी राहिलेली प्रेमकथा दुसऱ्या भागात प्रेक्षकांना आनंद देत पूर्ण झाली. पहिल्या भागात बालपणात एकमेकांपासून दुरावलेले दगडू आणि प्राजू दुसऱ्या भागात तरुणपणात एकमेकांना भेटले आणि एकही झाले. याच बालपण आणि तरुणपणाच्या मधल्या टप्प्यात दगडूचं नेमकं काय झालं ? प्राजू त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय बदल झाले? हे सांगणारी गोष्ट आता टाइमपास ३ मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या आणि रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या या चित्रपटाच्या टीझरने आणि गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये यापूर्वीच उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटाबद्दलची हीच उत्सुकता आणि उत्कंठा आता ट्रेलरमधून अधिकच वाढणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर एका शानदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक रवी जाधव, झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी, निर्मात्या मेघना जाधव यांसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

टाइमपासच्या दोन्ही भागात प्रेक्षकांना दगडू आणि प्राजूची प्रेमकथा बघायला मिळाली होती. याही भागात प्रेमकथा असणार आहेच पण यावेळी दगडूसोबत असणार आहे पालवी. आणि ही पालवी साकारली आहे सध्याच्या तरुणाईच्या ‘दिल की धडकन’ अशी ओळख असणाऱ्या हृता दुर्गुळे हिने. विशेष म्हणजे आजवर कधीच न बघितलेल्या अवतारात हृता आपल्याला यात दिसणार आहे. तिचा हाच डॅशिंग अवतार टिझर मधून प्रेक्षकांनी बघितला होताच आता ट्रेलरमधून डॅशिंग सोबत तिची ‘लव्हेबल’ अदाही बघायला मिळणार आहे.

आणखी वाचा- Timepass 3 : ऋता आणि प्रथमेशचं ‘लव्हेबल’ गाणं प्रदर्शित, ‘या’ दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटात दगडूच्या भूमिकेतील प्रथमेश परब आणि पालवी हृता दुर्गुळेसोबतच, माधव लेले उर्फ शाकाल म्हणजेच वैभव मांगले, शांताराम परब म्हणजे भाऊ कदम, आरती वडगबाळकर, दगडू गॅंग आणि एका जबरदस्त भूमिकेत संजय नार्वेकर बघायला मिळणार आहेत. चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत तर संगीत अमितराज यांचं आहे. चित्रपटाची कथा रवी जाधव यांची असून त्यांच्यासोबतीने प्रियदर्शन जाधव याने चित्रपटाची पटकथा आणि सवांद लिहिले आहेत. ‘टाइमपास ३’ चा धम्माल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून येत्या २९ जुलैला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Timepass 3 trailer release hruta durgule and prathamesh parab film mrj