Tom Cruise Mission Impossible Amul Pays Tribute : ‘मिशन इम्पॉसिबल’ या चित्रपट मालिकेची जवळपास तीन दशकं चाहत्यांमध्ये बरीच क्रेझ आहे. ‘मिशन इम्पॉसिबल’च्या सर्वच भागांनी अ‍ॅक्शन चित्रपटांचं मोजमापच बदलून टाकलं आहे. या चित्रपटांच्या केंद्रस्थानी एक असा माणूस आहे, जो असंभव वाटणाऱ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत लढतो. हा माणूस आहे ‘मिशन इम्पॉसिबल’चा नायक टॉम क्रूज. या चित्रपट मालिकेचा दुसरा भाग आणि फ्रँचायझीचा आठवा आणि शेवटचा भाग १७ मे रोजी भारतात प्रदर्शित झाला आहे.

‘मिशन इम्पॉसिबल द फायनल रेकनिंग’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी तो अमेरिकेच्या सहा दिवस आधी भारतात प्रदर्शित केला आहे. चाहते चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांत गर्दी करत असताना, ‘अमूल’ या दूध कंपनीने अलीकडेच क्रूझच्या आयकॉनिक पात्र इथन हंट आणि ‘मिशन इम्पॉसिबल चित्रपट मालिकेला अनोखी मानवंदना दिली आहे. ‘अमूल’ कंपनीने ‘मिशन इम्पॉसिबल’ स्वरूपात क्रूझचं कार्टून स्केच सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

काळ्या रंगाच्या पोशाखात क्रूझने एका हातात हेलिकॉप्टरचे हँडल पकडले आहे, तर दुसऱ्या हातात बटर केलेल्या टोस्टचा तुकडा धरलेला दाखवल्याचे या कार्टून स्केचमध्ये पाहायला मिळत आहे. या खास स्केचसह त्यांनी ‘अशक्य चवदार’ असं म्हटलं आहे. त्याचबरोबर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘अमूल टॉपिकल: टॉम क्रूझचा मिशन इम्पॉसिबलचा शेवटचा भाग!’ असं लिहिलेलं पाहायला मिळत आहे. ‘अमूल’ने शेअर केलेल्या कार्टून स्केचला चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलीच पसंती दर्शवली आहे.

दरम्यान, ‘मिशन इम्पॉसिबल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिस्टोफर मॅकक्वेरी यांनी केले आहे. तर यात टॉम क्रूझसह हेली एटवेल, विंग रेम्स, सायमन पेग, व्हेनेसा किर्बी, पोम क्लेमेंटीफ, शिया व्हिघम, अँजेला बॅसेट, एसाई मोरालेस, हेन्री झर्नी, होल्ट मॅककॅलेनी, निक ऑफरमन आणि ग्रेग टार्झन डेव्हिस या कलाकारांचा समावेश आहे.

पॅरामाउंट पिक्चर्स आणि स्कायडान्स प्रस्तुत, ‘मिशन इम्पॉसिबल द फायनल रेकनिंग’ हा चित्रपट १७ मे रोजी भारतात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत उपलब्ध आहे. या चित्रपटाने अवघ्या काही तासांतच काही बॉलिवूड चित्रपटांचा पहिल्या दिवशीच्या कलेक्शनचा विक्रम मोडला आहे.