सोशल मीडिया हे सेलिब्रिटी व चाहते यांच्यातील अंतर कमी करण्याचं प्रभावी माध्यम समजलं जातं. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या अॅपद्वारे सेलिब्रिटी थेट चाहत्यांच्या संपर्कात असतात. ‘बर्फी’, ‘रेड’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हिने नुकताच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यादरम्यान चाहत्यांनी तिला तिच्या आवडीनिवडी, लाइफस्टाइल, छंद यांविषयी काही प्रश्न विचारले. इलियानानेही त्यांची मनमोकळेपणाने उत्तरं दिलं. या प्रश्नोत्तरादरम्यान एका चाहत्याने इलियानाला तिच्या व्हर्जिनिटीबाबत प्रश्न विचारला.

”कोणत्या वयात तू तुझी व्हर्जिनिटी गमावलीस,” असा प्रश्न चाहत्याने विचारला. त्यावर इलियाना सडेतोड उत्तर देत म्हणाली, ”वॉव.. दुसऱ्यांच्या खासगी आयुष्यात नाक खुपसण्याची फार हौस आहे वाटतं. यावर तुझी आई काय म्हणणार?”

गेल्या महिन्यात जेव्हा अभिनेता टायगर श्रॉफ इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधत होता तेव्हा त्यालासुद्धा असाच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर टायगरने म्हटलं होतं, ”अरे निर्लज्ज माणसा, माझे आई-वडीलसुद्धा मला फॉलो करतात.”

इलियानाला बऱ्याचदा बॉडी-शेमिंगचाही सामना करावा लागला. मात्र प्रत्येक वेळी तिने सडेतोड, बेधडक उत्तर देत ट्रोलर्सना गप्प केलं होतं. ती लवकरच अनिस बाजमीच्या ‘पागलपंती’ या कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये अनिल कपूर, जॉन अब्राहम, अर्शद वारसी, पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्याही भूमिका आहेत. ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.