सोशल मीडियाच्या युगात खरंच गुणवत्ता असेल तर कोणाला कधी आणि कशी प्रसिद्धी मिळेल, सांगता येत नाही. असाच एक १८ वर्षांचा मुलगा आपल्या जबरदस्त नृत्याच्या जोरावर रातोरात प्रसिद्ध झाला. बाबा जॅक्सन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या टिक-टॉकरने सोशल मीडियावर डान्स करुन तब्बल एक कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे.
लॉकडाउनच्या काळात फ्लिपकार्टने एक डान्स रिअॅलिटी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला ‘एन्टरटेन्मेंट नंबर वन’ असं नाव देण्यात आलं होतं. या स्पर्धेत अभिनेता वरुण धवन मुख्य पर्यावेक्षकाच्या भूमिकेत होता. वरुणने बाबा जॅक्सनला या स्पर्धेचा विजेता म्हणून घोषित केलं आहे. त्याला तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षिस मिळालं आहे. वरुणने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन याबाबत माहिती दिली.
कोण आहे बाब जॅक्सन?
बाबा जॅक्सन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुलाचं खरं नाव युवराज सिंग असं आहे. त्याला भारतीय मायकल जॅक्सन असही म्हणतात. तो हुबेहुब मायकल जॅक्सनसारखा डान्स करतो. डान्स करण्याची प्रेरणा त्याला टायगर श्रॉफच्या ‘मुन्ना मायकल’ चित्रपटातून मिळाली. तेव्हापासून त्याने नृत्याचा सराव सुरू केला. त्याची हातापायांची हाडं गाण्याच्या आणि संगीताच्या ठेक्यावर अशा काही पद्धतीने तो डुलवतो की, पाहणारे फक्त पाहतच राहतात. अमिताभ बच्चन, डान्सर रेमो डिझुजा, अभिनेता वरुण धवन, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, या सर्वांनी बाबा जॅक्सनचे कौतुक केले आहे. मध्यंतरी त्याने ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिअॅलिटी शोमध्ये भागही घेतला होता.