ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते आणि राजकीय नेते नागेंद्र बाबू यांनी त्यांची मुलगी निहारिका कोनिडेला हिच्या घटस्फोटाबद्दल अखेर मौन सोडलं आहे. निहारिकाचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. लेकीचं २०२० मध्ये उदयपूर येथे एका भव्य समारंभात चैतन्य जोन्नगलद्दाशी थाटामाटात लग्न लावून दिलं होतं, पण ते फार काळ टिकलं नाही, यात आपली चूक असल्याचं नागेंद्र बाबू म्हणाले.

नागेंद्र बाबू हे तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी व आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचे भाऊ आहेत. डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या मुलाखतीत नागा बाबू यांनी निहारिकाच्या घटस्फोटाबद्दल प्रतिक्रिया दिली. निहारिकाचा घटस्फोट २०२३ मध्ये झाला. नागेंद्र बाबू म्हणाले, “निहारिका व मी जवळपास सर्व गोष्टींबद्दल एकमेकांशी बोलतो. मी माझ्या मुलांच्या करिअरमध्ये कधीही हस्तक्षेप करत नाही. माझ्या मुलांचे चित्रपट हिट होतात की फ्लॉप याची मला पर्वा नाही. माझी प्राथमिकता त्यांचा आनंद आहे. जर ते खूश नसतील तर कोट्यवधी रुपये असूनही काय कामाचे?”

वडिलांनी वरुणला विचारलेले प्रश्न

नागेंद्र बाबू यांचा मुलगा व तेलुगू अभिनेता वरुण तेजने अभिनेत्री लावण्या त्रिपाठीशी लग्न केलंय. वरुणने त्याच्या नात्याबद्दल सांगितलं तेव्हा नागेंद्र यांनी त्याला काही प्रश्न विचारले होते. “जेव्हा वरुणने मला सांगितलं की त्याला लावण्या त्रिपाठीशी लग्न करायचंय, तेव्हा मी त्याला पहिला प्रश्न विचारला ‘तू तिच्याबरोबर आनंदी राहशील का? भविष्यात येणाऱ्या समस्या तू नीट हाताळशील का?’ वरुणने तो लावण्याबरोबर आनंदी राहणार असल्याचं आश्वासन मला दिलं आणि मग मी त्यांच्या लग्नाला होकार दिला. वरुणचा निर्णय बरोबर होता, आता ते दोघे खूप आनंदी आहेत,” असं नागेंद्र बाबू यांनी स्पष्ट केलं.

आमचा निर्णय चुकला – नागेंद्र बाबू

लेक निहारिकाच्या लग्नाच्या बाबतीत आपण चूक केली, असं वक्तव्य नागेंद्र बाबू यांनी केलं. “माझा निर्णय चुकला. तिचं लग्न ही आमची चूक होती. आम्ही सगळ्या गोष्टी नीट समजून घेऊ शकलो नाही. खरं तर आम्ही लग्नासाठी जबरदस्ती केली नव्हती. लग्नाचा प्रस्ताव आला, तिने होकार दिला आणि आम्हाला वाटलं की सगळं चांगलं होईल,” असं ते म्हणाले.

निहारिका व चैतन्य यांच्यात समन्वय नव्हता. त्यांनी प्रयत्न केला, पण गोष्टी ठिक झाल्या नाहीत, त्यामुळे त्यांनी परस्पर वेगळं व्हायचं ठरवलं. “ते एकत्र खूश नव्हते आणि त्यांना सोबत राहायचं नव्हतं. मीही त्यांच्या निर्णयाशी सहमत होतो,” असं निहारिकाच्या घटस्फोटाबद्दल नागेंद्र बाबू म्हणाले.

निहारिका घटस्फोटानंतर इंडस्ट्रीत सक्रिय झाली आहे. आता ती चित्रपटांची निर्मिती करतेय आणि भविष्यात तिला चांगला जोडीदार मिळाला आणि लग्न करावं वाटलं तर ती नक्कीच करेल, असं नागेंद्र बाबू यांनी नमूद केलं.