विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे रिसेप्शन आज मुंबईत आहे. काही वेळापूर्वीच विराट आणि अनुष्का दोघेही द सेंट रेगिस या हॉटेलमध्ये पोहचले आहेत. त्याचसोबत बॉलिवूड सेलिब्रेटी आणि क्रीडा विश्वातीलही अनेक खेळाडूंनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. भारतीय क्रिकेट संघातील रविंद्र अश्विन, चेतेश्वर पूजारा, उमेश यादव, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, माजी क्रिकेटर सुनील गावस्कर, वीरेंद्र सहवाग, बॅडमिंटनपटू साइना नेहवाल, माजी क्रिकेटर संदीप पाटील यांच्यासमवेत अनेकांनी या रिसेप्शनला हजेरी लावली आहे.

विराट आणि अनुष्का यांनी ११ डिसेंबरलाच इटलीमध्ये अत्यंत निवडक लोकांच्या हजेरीत लग्न केले. त्यानंतर या दोघांच्या लग्नाच्या फोटोंची आणि विवाहाचीही चांगलीच चर्चा रंगली. भारतात परतल्यावर या दोघांनीही दिल्ली या ठिकाणी पहिले रिसेप्शन दिले. दिल्लीत झालेल्या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हजेरी लावली होती. आज त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन मुंबईत पार पडते आहे.  द सेंट रेगिस या  शाही हॉटेलमध्ये ३९५ खोल्या आहेत. ज्यामध्ये २७ सूट्स आणि ३९ रेसिडेन्शियल सूटस आहेत. या खास सूट्समधून अरबी समुद्राचा सुंदर नजारा दिसतो.

मुंबईतील रिसेप्शननंतर अनुष्का शर्मा विराट कोहलीसोबत साऊथ अफ्रिकेला जाणार आहे. विराट आणि अनुष्का यांचे नवे वर्ष दक्षिण अफ्रिकेत साजरे होणार आहे. तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अनुष्का मुंबईत परतणार आहे अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.