‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटाचा सीक्वेल असलेला ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ हा चित्रपट १० मे रोजी शुक्रवारी प्रदर्शित झाला. करण जोहरच्या ‘कलंक’ चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली होती. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होती. पण पुन्हा एकदा त्यांची निराशा झाली. चित्रपट बघताना पहिल्या भागातील रोहन, शनाया, अभी यांना शोधण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा काहीच संदर्भ सीक्वेलमध्ये सापडत नाही. त्यामुळे कथा, अभिनय आणि सर्वच स्तरावर हाती शून्यच येत असल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या चित्रपटाला चांगलंच ट्रोल केलं आहे.

करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातही अनेक व्यक्तिरेखा, प्रेम-मैत्री-महाविद्यालयीन स्पर्धा असली तरी निदान अभ्यासाचीही स्पर्धा होती. त्यामुळे खच्चून नाटय़ भरलेले होते आणि रट्टा मार म्हणत गाण्यापुरती का होईना मुले अभ्यास करताना दिसली होती. या चित्रपटात मुले एक तर नृत्य करताना दिसतात किंवा कबड्डी खेळताना दिसतात नाही तर मारामारी करतात. त्यामुळे टायगर श्रॉफ आता ‘अॅव्हेंजर्स’च्या सीरिजमध्ये झळकू शकतो अशी खिल्लीसुद्धा नेटकऱ्यांनी उडवली. ‘चित्रपटाच्या उत्तरार्धात बघण्यासारखं काहीच शिल्लक राहत नाही. फक्त मारामारी पाहायला मिळते,’ अशी टीका प्रेक्षकांनी केली आहे.

https://twitter.com/one_by_two/status/1126431624881684480

https://twitter.com/Unsakht/status/1126726928709242881

टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने दोन दिवसांत जवळपास २६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. पण सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमुळे येत्या हा काळात हा चित्रपट चांगली कमाई करू शकेल का यावर प्रश्नचिन्हच आहे.