‘प्रवाशांच्या जिवाशी खेळ’ या ‘मुंबई वृत्तान्त’मधील वृत्ताची दखल घेत पश्चिम उपनगरातील प्रादेशिक परिवहन विभागाने शुक्रवारी बोरिवली-गोराई भागातील १२ रिक्षांवर कारवाई केली. या रिक्षांचे परवाने निलंबित केले असून चालकांचे परवाने जप्त करण्यात आले आहेत.
बोरिवली-गोराई मार्गावर शेअर रिक्षा चालविणारे रिक्षाचालक तीन ऐवजी पाच प्रवासी बसवून भरधाव रिक्षा चालवत असल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. याबाबतचे वृत्त शुक्रवारी ‘लोकसत्ता’च्या ‘मुंबई वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याची तात्काळ दखल परिवहन विभागाने घेतली आणि सकाळपासूनच या मार्गावरील रिक्षांची तपासणी सुरू केली. या तपासणीमध्ये १२ रिक्षा अतिरिक्त प्रवासी घेऊन प्रवास करताना आढळल्या. यातील काही रिक्षांमध्ये तांत्रिक दोषही आढळून आल्याचे परिवहन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. एका रिक्षाच्या फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपली होती. या सर्व रिक्षांचे परवाने निलंबित करण्यात आले असून चालकांचे परवानेही जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 rickshaw licence suspended over breaking traffic rules in borivali