मुंबई : नवोदित कलाकारांना व्यासपीठ देणाऱ्या, तसेच कलाप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या काळा घोडा कला महोत्सवाला सुरुवात झाली असून प्रतिभावंत कलाकारांच्या कल्पनेतून साकारलेल्या सृजनशील कलाकृती पाहण्यासाठी कलप्रेमींची गर्दी झाली आहे. महोत्सवाचे यंदाचे २५ वे वर्ष आहे. काळा घोडा असोसिएशनतर्फे दरवर्षी कलेला केंद्रस्थानी ठेऊन काळा घोडा कला महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवाची सुरुवात १०९९ साली झाली. तेव्हापासून कलेचा वारसा जोपासत आता विदेशातही महोत्सवाची महिमा पोहोचली आहे. यंदा २ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणाऱ्या या महोत्सवात विदेशी कलाप्रेमीही सहभागी झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशाच्या विविध भागातून आलेल्या कलाकारांच्या कलाकृतींच्या विक्रीसाठी १०० हुन अधिक दालने उभारण्यात आली आहेत. बांबू आणि स्टीलच्या बाटल्यांची विशिष्ट मांडणी करून साकारलेले महोत्सवाचे प्रवेशद्वार, भंगारापासून तयार केलेल्या घोड्याच्या प्रतिकृतीसह काचेच्या तुकड्यांपासून नक्षीकाम केलेली घोड्याची प्रतिकृती, प्रवेशद्वारालगतच हुबेहूब केकसारखी भासणारी चारचाकीची प्रतिकृती खास आकर्षण ठरल्या आहेत.

दादासाहेब फाळके चित्रनगरीच्यावतीने महोत्सवात सिने निर्मितीसाठी लागणाऱ्या तांत्रिक टाकाऊ साहित्यातून घोड्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या प्रतिकृतीला सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा असे नाव देण्यात आले आहे. डॉ. सुमित पाटील यांनी या शिल्पाचे कला दिग्दर्शन केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25th edition of kala ghoda arts festival begins mumbai print news zws