थकबाकीदारांची वीज तोडण्याचा धडाका सुरू
महावितरणची वीजबिल थकबाकी ३६ हजार ४१५ कोटी रुपयांवर गेली असून आर्थिक संकट ओढवल्याने शेतकऱ्यांसह सर्व वीजग्राहकांच्या वीज जोडण्यांचा धडाका महावितरण कंपनीने सोमवारपासून सुरू केला आहे. राज्यातील ४२ लाख कृषीपंपधारक शेतकऱ्यांपैकी ३९ लाख थकबाकीदार असून हजारो शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या एप्रिल २०१७ नंतरचे वीजबिल न भरल्याने गेल्या तीन दिवसांत तोडण्यात आल्या आहेत. कर्जमाफी दिल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या वीज बिल वसुलीची मोहीम महावितरणने हाती घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविल्याने आता ही मोहीम तीव्र होणार आहे. मात्र शेतकऱ्यांची वीज तोडल्याचे राजकीय पडसाद उमटणार असून मोफत विजेची मागणीही जोर धरण्याची भीती उच्चपदस्थ सूत्रांनी व्यक्त केली.
कृषीपंपांची वीज थकबाकी ही कायमच महावितरणची डोकेदुखी राहिली असून ही थकबाकी ऑगस्टअखेरीपर्यंत सुमारे २० हजार कोटी रुपयांवर गेली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने दुष्काळी परिस्थिती असल्याने गेल्या तीन वर्षांत शेतकऱ्यांची वीज न तोडण्याच्या सूचना महावितरणला दिल्या होत्या. कर्जमाफीची मागणी झाल्यापासून आणि मोफत विजेचीही चर्चा सुरू झाल्याने वीजबिल भरण्याचे प्रमाण सुमारे १४ टक्क्यांवरच राहिले आहे. सुमारे ४२ लाख कृषीपंपधारकांपैकी ३९ लाख शेतकरी थकबाकीधारक असल्याने आता हजारो शेतकऱ्यांची वीज तोडण्यास सुरुवात करणे महावितरणला आर्थिक अडचणींमुळे भाग पडले आहे. कृषी क्षेत्राकडून वीजबिल वसुली न झाल्यास त्याचा भार औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांवर पडतो. त्यामुळे पर्यायच राहिलेला नाही, असे उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. थकबाकीदारांमध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे असले तरी ३६ हजार ४१५ कोटी रुपयांची थकबाकी सुमारे एक कोटी ५० लाख १३ हजार ग्राहकांकडे प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच अन्य एक कोटी ग्राहकांकडूनही वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
मराठवाडय़ात थकबाकीचे प्रमाण मोठे असून सुमारे ४३ लाख ४२ हजार ग्राहकांकडे १५ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. मराठवाडय़ात गेली काही वर्षे दुष्काळ होता. पण यंदा पाऊस चांगला झाल्याने मराठवाडय़ात वीजबिल वसुलीची मोहीम मोठय़ा प्रमाणावर हाती घेण्यात आली आहे. कृषी क्षेत्रासाठी दर तिमाहीला सुमारे ७५० कोटी रुपयांची वीजबिले पाठविली जातात. मात्र वसुलीचे प्रमाण १४ टक्के इतके आहे. व्याज व दंडामुळे ही रक्कम २० हजार कोटी रुपयांवर गेली आहे. आता सरकारने कर्जमाफी दिल्याने व यंदा पाऊस चांगला झाल्याने महावितरणची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हजारो शेतकरी व अन्य ग्राहकांच्या वीजजोडण्या तोडून बिलवसुलीची मोहीम हाती घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
