मंगल कार्यालयाची जागा मतदान केंद्र झाल्याने ४० विवाह सोहळे अडचणीत
संतोष जाधव, नवी मुंबई</strong>
सार्वत्रिक निवडणुकीसाठी नेरुळचे आगरी कोळी भवन जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कामांसाठी आरक्षित केल्याने तब्बल ४० लग्नसोहळे अडचणीत आले आहेत. यामुळे कित्येक महिने धावपळ करून लग्नासाठी सभागृहे आरक्षित करणाऱ्या कुटुंबांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
नेरुळ येथील लग्नसोहळ्यांसह विविध कार्यक्रमांसाठी मोक्याचे असलेले आगरी कोळी भवन निवडणूक कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षित केले आहे. यामुळे आता ऐनवेळी लग्नासाठी नवे सभागृह शोधण्यासाठी वधू-वराकडील मंडळींची धावाधाव सुरू आहे.
निवडणुकीसाठी कोणतीही जागा तात्पुरती ताब्यात घेण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असला, तरी सहा-सहा महिन्यांपासून लग्नासाठी सभागृहे आरक्षित करणाऱ्यांचा ‘ग्राहक’ म्हणून काही अधिकार आहे की नाही, असाही प्रश्न विचारला जात आहे.
सिडकोनिर्मिती आगरी कोळी महोत्सव ही नवी मुंबईतील महत्त्वाची वास्तू आहे. नेरुळ या मध्यवर्ती उपनगरात पामबीच मार्गालगत असल्याने येथे लग्नसोहळे, राजकीय मेळावे, सभा, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. लग्नसोहळ्यासाठी सहा महिने अगोदरच सभागृह आरक्षित करावे लागते. त्याप्रमाणे आतापर्यंत येथे ४० लग्न सोहळे आरक्षित करण्यात आले होते. मात्र निवडणुकीच्या कामासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ही संपूर्ण वास्तू २० एप्रिल ते २५ मे पर्यंत आरक्षित केल्याचे पत्र सिडकोला पाठवले आहे. त्यामुळे लग्नघराची मंडळी चिंतेत पडली आहेत. सिडकोने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीही केली. मात्र याबाबत अद्याप भूमिका जाहीर न झाल्याने सर्व बुचकळ्यात पडले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या भवनात दुसऱ्या माळ्यावर लग्नासाठी प्रशस्त सभागृह आहे. सुमारे एक हजार आसनक्षमता असलेल्या या लग्नसभागृहासाठी अनामत रकमेसह ९५ हजार ४५२ रुपये भाडे आहे. या ४० कुटुंबांनी इतके पैसे भरून हे सभागृह आरक्षित केले होते.
जिल्हाधिकाऱ्यांना लग्नासाठीच्या आरक्षणाविषयी माहिती दिलेली आहे. परंतु अद्याप निवडणूक कामातून हे सभागृह वगळण्यात आल्याचे आम्हाला कळविण्यात आलेले नाही.
– एम. महाले, कार्यकारी अभियंता, सिडको
मी नेरुळ सेक्टर १६ ए येथे राहतो. माझ्या मुलीचे २४ मे रोजी लग्न आहे. त्यासाठी सहा महिन्यांपूर्वीच सभागृह आरक्षित केले. लग्नाच्या पत्रिकाही छापल्या आहेत. त्यावर या ठिकाणाचा पत्ताही दिला आहे. पण अचानक ही जागा निवडणुकीसाठी आरक्षित केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आमची मोठी अडचण झाली आहे.
– सदाशिव शेट्टी, नेरुळ