मुंबई: रस्त्यावर बंद पडलेली वाहने हटवण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात ४३ क्रेन दाखल झाल्या आहेत. पूर्वी अशी बंद पडलेली वाहने हटविण्यासाठी पालिकेच्या क्रेनचा वापर करण्यात येत होता. त्यामुळे अनेकदा क्रेन घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होत असे आणि परिणामी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असे.

मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्नशील असतात. शहरातील रस्त्यावरून हलक्या, जड, अवजड अशा वाहनांची मोठी वर्दळ असते. काही वेळा वाहने तांत्रिक बिघाड होऊन रस्त्यात बंद पडतात. रस्त्यात एक जरी अवजड वाहन बंद पडले तर वाहतूक ठप्प होते. त्यातच उड्डाणपूलांवर वाहने बंद पडल्यानंतर मोठी वाहतूक कोंडी होते. अनेकदा ही वाहने महामार्गावर पहिल्या किंवा मधल्या वाहिनीवर असतात. भरधाव वेगाने प्रवास करणार्या वाहन चालकांना वाहने बंद असल्याचे निदर्शनास येत नसल्याने अपघात होतात. रस्त्यात मध्येच वाहन बंद पडल्यानंतर ते अल्पावधीत बाजूला करून मार्ग मोकळा करणे आवश्यक असते. मात्र तसे होत नसल्याने तासनतास वाहने जागच्या जागीच, दुरुस्त होईपर्यंत उभी असतात.

वाहतूक पोलिसांकडे वाहने हटविण्यासाठी स्वत:च्या मालकीच्या क्रेन नव्हत्या. त्यामुळे मुंबई महापालिकेशी संपर्क साधून क्रेन मागवावी लागत होती. या प्रक्रियेत विलंब होऊन वाहतूक कोंडी वाढत होती. त्यावर तोडगा काढण्याठी वाहतूक पोलिसांनी स्वत:च्या मालकीच्या क्रेन विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात ४३ क्रेन आणण्याचा प्रस्ताव असल्याची माहित सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी दिली. या क्रेन विभागवार ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे अवजड वाहने बंद पडल्यास ती तात्काळ क्रेनच्या मदतीने हटविण्यात येतील आणि वाहतूक कोंडी टाळता येईल, असे कुंभारे यांनी सांगितले.