आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा पराक्रम,  पुनर्तपासणीनंतरही दीडशे विद्यार्थी अनुत्तीर्णच

अवघ्या तासाभरापूर्वी कुलगुरूंनी पुनर्मूल्यांकनाच्या सूचनाच दिलेल्या नाहीत, असे कारण सांगून विद्यार्थ्यांना झटकू पाहणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या परीक्षा नियंत्रकाने, केवळ तासाभरात तब्बल ७७० उत्तरपत्रिका तपासून आपला शेरा दिल्याचा अजब प्रकार उघड झाला आहे. विद्यापीठाच्या बीएस्सी-आयटी अभ्यासक्रमातील १५४ पैकी १४६ विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करणाऱ्या निकालावर परीक्षा विभागाने अशा प्रकारे पुनर्तपासणीचा शिक्का मारला. आधीच विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे अनुत्तीर्ण ठरवण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांवर आता ‘एटीकेटी’चा शिक्का बसला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या ‘दूर व मुक्त अध्ययन संस्थे’च्या (आयडॉल) माध्यमातून पाचव्या सत्राची परीक्षा दिलेल्या तृतीय वर्ष विज्ञान शाखेची (माहिती तंत्रज्ञान-आयटी) परीक्षा दिलेल्या १५४ विद्यार्थ्यांपैकी अवघे आठ विद्यार्थी १५ फेब्रुवारीला लागलेल्या निकालाद्वारे उत्तीर्ण जाहीर करण्यात आले. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने १ मार्च रोजी दिले होते. कित्येक विद्यार्थ्यांना सर्वच विषयांमध्ये चक्क शून्य गुण मिळाले आहेत. त्यामुळे या निकालावर आक्षेप घेत सर्व विषयांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी कुलगुरू संजय देशमुख यांच्याकडे केली होती. या भेटीदरम्यान विद्यापीठाने विद्यार्थ्यांसमोर उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती हव्यात की पुनर्मूल्यांकन करून हवे, असे पर्याय ठेवले. विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकन करून घेण्याचा पर्याय निवडताच ‘पुनर्मूल्यांकन करून हवे असल्यास ‘आयडॉल’च्या संचालिका अंबुजा साळगावकर यांच्याकडे पत्र द्या’ असे कुलगुरूंनी आम्हाला सांगितल्याचे एका विद्यार्थ्यांने सांगितले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी साळगावकर यांच्याकडे पत्र दिले. दरम्यानच्या काळात उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळवण्यासाठीची मुदत टळून गेली.

‘आम्ही आयडॉलच्या संचालिका साळगावकर यांना भेटलो. तर त्यांनी नियंत्रकांकडून उत्तरपत्रिकाच तपासणीकरिता आल्या नसल्याचे सांगितले. म्हणून ३ एप्रिलला दुपारी १च्या सुमारास परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांची भेट घेतली. सुरुवातीला त्यांनी आपल्याला कुलगुरूंनी पुनर्मूल्यांकन करण्यास कळविलेच नसल्याचे सांगितले. त्यावर आम्ही कुलगुरूंशी झालेल्या पत्रव्यवहाराची माहिती त्यांना दिली. त्यानंतर त्यांनी आम्हाला थांबण्यास सांगितले आणि ते त्यांच्या केबिनमध्ये गेले. तासाभरानंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी आमच्या हातावर एक पत्र टेकवले. त्यात आमच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन दोन इतर शिक्षकांकडून करण्यात आले असून त्यांनी आमची गुणवाढ तर सोडाच, उलट ते कमी होतील, असा अभिप्राय पत्रात दिल्याचा दावा केला. हे पत्र वाचून तर आमच्या सर्वच आशा मावळल्या,’ अशा शब्दांत या विद्यार्थ्यांने आपली निराशा व्यक्त केली.

तासाभरापूर्वी जे नियंत्रक मूल्यांकन झाले नसल्याचे सांगतात ते तासाभरात आमच्या सुमारे ७७० उत्तरपत्रिका (प्रत्येकी ३० ते ४० पाने) तपासून परीक्षकांनी अभिप्राय दिल्याचा दावा कसा काय करू शकतात, असा सवाल विद्यार्थी करत आहेत. काही दिवसांपूर्वी ३० टक्के निकाल लागल्याने ‘एलएलएम’च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचे आदेश विद्यापीठाने दिले होते. मग हाच न्याय आम्हाला का नाही? एलएलएमच्या विद्यार्थ्यांनी राजकीय नेत्यांकडे आपली कैफियत मांडली होती. आम्ही विद्यापीठ प्रशासनावर विश्वास दाखविला ही आमची चूक झाली काय? कारण, कुलगुरूंनी आदेश देऊनही आमच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन झाले नव्हते. शेवटी आम्ही राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे आमचे गाऱ्हाणे मांडण्याचे ठरविले आहे,’ अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी आपली हतबलता व्यक्त केली.

या बाबत परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी लीलाधर बनसोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘वसावे यांनी पुनर्मूल्यांकन करून त्यात बदल नसल्याचा खुलासा केला आहे’ असे उत्तर दिले. मात्र दोन प्राध्यापक असले तरी तासाभरात १५० विद्यार्थ्यांच्या पाच विषयांच्या मिळून ७७० उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन कसे करता येईल, या प्रश्नावर त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते. कदाचित परीक्षा विभागाने साळगावकर यांच्याकडून उत्तरपत्रिका तपासून घेतल्या असाव्या, असा दावा त्यांनी केला. मात्र, साळगावकर यांनी विद्यार्थ्यांना सांगताना आपल्याकडे उत्तरपत्रिका तपासणीकरिता आल्या नसल्याचा दावा केला होता. साळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माझी आज सुट्टी असल्याने आज काही बोलणार नसल्याचे उत्तर दिले.

प्रवेशापासूनच घोळ

या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून घोळाला सामोरे जावे लागत आहे. त्यांना त्यांचे प्रवेश निश्चित झाल्याचे १० नोव्हेंबरला (२०१६) मोबाइलवर संदेश पाठवून कळविण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना त्यांची पाचव्या सत्राची परीक्षा १७ नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याचा गोंधळात घालणारा संदेश आला. या अभ्यासक्रमाकरिता किमान २० लेक्चर्स होणे आवश्यक आहेत. परंतु ते न घेताच इतक्या कमी वेळेत आम्ही परीक्षेची तयारी तरी कशी करायची? विद्यार्थ्यांच्या मिनतवारीनंतर अखेर परीक्षा विभागाने त्यांची परीक्षा २७ डिसेंबपर्यंत पुढे ढकलली. आता सदोष निकालामुळे त्यांची पायपीट सुरूच आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 770 papers revaluation in hour