डास निर्मूलन आणि डेंग्यू रोखण्यासाठी उपाययोजना करीत असल्याची सारवासारव पालिका प्रशासनाकडून सुरू असतानाच गुरुवारी अंधेरी येथे एका तीन वर्षांच्या चिमुकलीला डेंग्यूमुळे प्राण गमवावे लागले. त्यामुळे आता मुंबईतील डेंग्यूच्या बळींची संख्या नऊवर पोहोचली आहे, तर केईएम रुग्णालयातील आणखी दोन निवासी डॉक्टरांना डेंग्यूची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. परिणामी केईएम रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आणि रुग्णांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
अंधेरी येथे राहणाऱ्या मानसी मंगेश देवरुखकर या तीन वर्षांच्या चिमुकलीला डेंग्यूची बाधा झाल्यामुळे बुधवारी तिला होली स्पिरिट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डेंग्यूमुळे मानसीचे गुरुवारी निधन झाले. मानसीच्या मृत्यूमुळे डेंग्यूच्या बळींची एकूण संख्या नऊ झाली आहे, तर गेल्या आठवडय़ाभरात डेंग्यूमुळे पाच जणांना प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या आठवडय़ात केईएममधील डॉ. श्रुती खोब्रागडे (२४) यांचे डेंग्यूमुळे निधन झाले होते. गेल्या आठवडाभरात केईएममधील आणखी सात निवासी डॉक्टरांना डेंग्यू झाला असून त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
निवासी डॉक्टरच डेंग्यूमुळे आजारी पडल्यामुळे केईएम रुग्णालयातील इतर निवासी डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांबरोबर उपचारासाठी दाखल झालेले आणि बाह्य़रुग्ण विभागात येणारे रुग्णही धास्तावले आहेत. दरम्यान, नाशिक व पिंपरीमध्येही डेंग्यूचे थैमान सुरू आहे. नाशिकमध्ये एकाच दिवशी दोन तर पिंपरीत एका रुग्णाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला.
आरोग्य विभागाने नोटीस बजावल्यानंतर केईएम रुग्णालयात साफसफाई हाती घेण्यात आली आहे. पाणीगळतीच्या ठिकाणी ठोस उपाययोजना करून डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करण्यात आली आहेत.
– राजन नरिंग्रेकर, कीटकनाशक अधिकारी