मुंबई : मूल्यवर्धीत कर न भरता सात कोटी ९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपखाली एका कंपनीसह दोघांविरोधात व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य कर आयुक्तालयाकडून याप्रकरणी तक्रार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राज्य कर निरीक्षक चेतन चव्हाण यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी व्हीपी रोड पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०(फसवणूक), ३४ (सामायिक गुन्हेगारी कृत्य) व महाराष्ट्र मूल्यकर अधिनियम २००२ कलम ७४(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे. विजय फेरारोमेंट प्रा. लि. चे राकेश कपूरचंद संघवी व कपूरचंद संघवी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा – महाराष्ट्राची कुष्ठरोग निर्मूलनाकडे वाटचाल! चार दशकात ६२.६४ वरून १.२ वर आले कुष्ठरुग्णांचे प्रमाण…

हेही वाचा – देवीचे चित्र असलेल्या नाण्याच्या नावाखाली वयोवृद्धाची लाखोंची फसवणूक

तक्रारीनुसार १ जानेवारी २०१३ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत कंपनी संचालकांनी मूल्यवर्धीत कर भरला नाही. त्यानंतर त्याचे व्याज व शास्ती काहीही भरण्यात आले नाही. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंपनी व संचालकांशी पत्र व्यवहार केला. त्याबाबतही कोणतेही उत्तर आले नाही. तसेच कंपनीचा नोंदणीकृत पत्ता व संचालकांचा पत्ता बदलण्यात आल्याचेही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले. अखेर त्यांनी याप्रकरणी व्हीपी रोड पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.