मुंबई : वरळी परिसरातील निवासी इमारतीच्या उद्वाहनातून पाळीव श्वानाला नेत असताना त्याने उद्वहनातील एकाला चावा घेतला. या प्रकरणी दंडाधिकाऱ्यांनी श्वानाच्या मालकाला दोषी ठरवून चार महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. घटनेनंतर सात वर्षांनी हा निर्णय देण्यात आला.आरोपी ऋषभ पटेल (४०) याला न्यायालयाने चार हजार रुपयांचा दंडही आकारला. या घटनेमुळे तक्रारदाराला सहन कराव्या लागलेल्या त्रासाची भरपाई पैशांनी होऊ शकत नाही. तथापि, त्याला काही प्रमाणात दिलासा मिळेल, असे न्यायालयाने म्हटले. दंडाधिकारी सुहास भोसले यांनी आरोपीला स्वेच्छेने दुखापत करणे आणि प्राण्यांच्या बाबतीत निष्काळजीपणाने वागणे या दोन आरोपांतर्गत दोषी ठरवले व चार महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

ही घटना १ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार तक्रारदार रमिक शहा त्यांच्या दीड वर्षाच्या मुलासह आणि नोकरासह उद्वाहनाने खाली येत होते. त्यावेळी, पटेल याने श्वानासह उद्वाहनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मुलाला श्वानाची भीती वाटत असल्याने शहा यांनी पटेल याला वाट पाहण्याची विनंती केली. परंतु पटेल याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि श्वानाला घेऊन उद्वाहनात प्रवेश केला. त्यावेळी, श्वानाने शहा यांच्या डाव्या हाताला चावा घेतला. या प्रकरणी शहा यांनी वरळी पोलिसांत पटेल याच्याविरोधात तक्रार नोंदवली.

आरोपी दयेस पात्र नाही

पोलिसांनी या प्रकरणी पटेल याच्याविरोधात चार साक्षीदार तपासले. तसेच, उद्वाहनातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद चित्रिकरण पुरावा म्हणून न्यायालयात सादर केले. न्यायालयाने त्याची प्रामुख्याने दखल घेतली. तसेच, पटेल याने श्वानाला उद्वाहनात ज्या प्रकारे ओढले. त्यावरून त्याची श्वानाप्रतीची वागणूक योग्य नसल्याचे दिसून येते, असे निरीक्षणही न्यायालयाने पटेल याला त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरवताना नोंदवले. आरोपीला तक्रारदार, त्याचा मुलगा किंवा कोणाचीच पर्वा नव्हती. उद्ववाहन हे सामान्यतः मानवी वापरासाठी असते. असे असतानाही पटेल याने स्वत:च्या पाळीव श्वानालाही उद्वाहनात ओढले. या सगळ्यांचा विचार करता तो शिक्षेत दया दाखवण्यास पात्र नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.