महाराष्ट्र पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जितेंद्र ‘जीतू’ नवलानी (७२) यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालय अधिकार्‍यांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा दावा करून अनेक व्यावसायिकांकडून सुमारे ५९ कोटी रुपये गोळा केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला होता की नवलानी, ईडीच्या तीन अधिकार्‍यांसह, विशिष्ट व्यावसायिकांना लक्ष्य करून खंडणी रॅकेट चालवत होते आणि त्यांना पैशाच्या बदल्यात ईडी चौकशीपासून संरक्षण देत होते. राऊत यांनी मुंबईतील बिल्डर्स आणि व्यावसायिकांकडून १०० कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, नवलानी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांचा सहकारी असल्याचेही सांगण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मार्चमध्ये शिवसेना पक्षाचे कार्यकर्ता अरविंद भोसले यांनी लेखी तक्रार दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी आरोपांची चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी वीरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. एसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना भोसले यांच्याकडून नवलानी आणि इतरांविरुद्ध तक्रार आली होती, त्यानंतर त्यांनी प्राथमिक चौकशी केली. “चौकशीच्या आधारे, आम्हाला आढळले की नवलानी, इतर साथीदारांसह, ईडी अधिकार्‍यांच्या वतीने काम करत असल्याचा दावा केला आणि अनेक व्यावसायिकांकडून पैसे उकळले,” असे अधिकाऱ्यांनी म्हटले.

“आमच्या तपासादरम्यान, २०१५ ते २०२१ दरम्यान आरोपींनी ५८.९६ कोटी रुपये गोळा केल्याचे समोर आले. अशा प्रकारे गोळा केलेला पैसा एकतर त्याच्याकडे किंवा त्याच्या नियंत्रणाखालील शेल कंपन्यांकडे असुरक्षित कर्ज किंवा सल्लागार शुल्काच्या रूपात ठेवण्यात आला होता,” असेही अधिकारे म्हणाले.

यानंतर, एसीबीने नवलानी आणि इतरांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७अ (लोकसेवकांना बेकायदेशीर मार्गाने प्रभावित करण्यासाठी अवाजवी फायदा घेणे) आणि ८ (लोकसेवकाला लाच देणे संबंधित गुन्हा) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ही रक्कम भरल्यास त्यांना ईडीच्या छाप्याला सामोरे जावे लागणार नाही, असा दावा करून नवलानी यांनी अनेक व्यावसायिकांकडून पैसे गोळा केले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की ते सध्या तपास करत आहेत की आरोपीने ईडी अधिकाऱ्यांच्या वतीने काम करत असल्याचे भासवले की आरोपी ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की ते या प्रकरणाशी संबंधित आणखी काही लोकांना त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी समन्स जारी करतील. आवश्यक असल्यास, ईडी अधिकार्‍यांना त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी देखील बोलावू, असेही अधिकारी म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acb files case against jitendra navlani for operating ransom racket with ed officials abn