मुंबई : झारखंड येथे हत्या करून मुंबईत पळून आलेल्या तरूणाला पकडण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले. मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून या तरूणाला धारावीमधून अटक केली. या तरूणाविरोधात झारखंडमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न यासारखे गंभीर पाच गुन्हे दाखल आहे. एका पोलिसांची हत्या केल्याच्या गुन्ह्याचा त्यात समावेश आहे.
हेही वाचा : बेस्ट बसला दुचाकी सेवेची जोड; वर्षभरात विजेवर धावणाऱ्या एक हजार दुचाकी सेवेत येणार
मोहम्मद साकिब हसन जमील अहमद (२१) असे अटक आरोपीचे नाव असून तो झारखंडमधील गिरीडीह येथील गड्डी मोहल्ल्यात वास्तव्याला होता. साकीब आणि मोहम्मद तौफिक यांनी मित्र जावेद याच्याकडे पैसे मागितले होते. मात्र जावेदने ते देण्यास नकार दिला. त्यामुळे साकीब आणि मोहम्मदने धारदार चाकूने जावेदवर वार केले. यात जावेदचा मृत्यू झाला.. याप्रकरणी झारखंडमधील पचंबा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर साकिब मुंबईला पळून आला होता.
झारखंड पोलिसांनी याप्रकरणाची मुंबई पोलिसांना माहिती दिली. आरोपी मुंबईत असल्याचेही पोलिसांना सांगण्यात आले. झारखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास केला असता साकीब धारावीमधील ९० फीट रोड येथील सोशल नगरमधील नरसिमा किराणा स्टोअरमध्ये येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई महेश सावंत यांना मिळाली. त्याच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी साकिबला अटक केली. गुन्हे शाखेच्या कार्यालयात त्याची चौकशी केली असता गुन्ह्यांतील त्याचा सहभाग उघड झाला. अखेर त्याला न्यायालयापुढे हजर करून ट्रान्झिट रिमांडवर झारखंडला नेण्यात आले.
आरोपीने १३ ऑगस्टला जावेदची हत्या केली होती. तपासादरम्यान शेजारच्या दुकानावरील सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रणावरून आरोपींची ओळख पटली होती. जावेदला एक लाख ८० हजार रुपयांची लॉटरी लागली होती. त्या लॉटरीवरून आरोपींनी जावेदची हत्या केल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.