अनिश पाटील, लोकसत्ता

मुंबई : देशात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मुंबई पोलिसांनी यावर्षी मोहिम तीव्र केली असून फक्त मुंबईत बेकायदा राहणाऱ्या ३१५ बांगला देशी नागरिकांना पकडले आहे. बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाईचा हा उच्चांक आहे. गेल्यावर्षी मुंबईत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १३९ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यात दुपटीपेक्षाही अधिक वाढ झाली आहे. रोजगारासाठी भारतात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची संख्या अधिक आहे.

मुंबईतील भोईवाडा येथे परदेशी नागरिकांसाठी स्थानबद्धता केंद्राचा प्रस्ताव शासनदरबारी आहे. परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात हद्दपार करण्यापूर्वी स्थानबद्ध करण्यासाठी भोईवाडा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्धता केंद्र स्थापन करण्याचे प्रस्तावीत असून त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच हे स्थानबद्धता केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वी यावर्षी मुंबई पोलिसांनी बांगला देशी नागरिकांविरोधातील मोहिम तीव्र केल्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत मुंबईतून ३१५ बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात बोरीवली पोलिसांनी एका बांगलादेशी दलालासह १७ बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रांसोबत अटक करण्यात केली होती. हे सर्व बांगलादेशी नागरिक अवैध मार्गाने भारतामध्ये दाखल होऊन बोरिवली पश्चिमेत येणार असल्याच्या माहिती बोरिवली पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे बोरिवली पोलिसांनी सापळा ही कारवाई केली आहे.

आणखी वाचा-मुंबई : परदेशातील नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक

बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्र तयार करण्यात मदत करणारा दलाल सलमान अयुब खान या आरोपीने मुंबई शहरात मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिकांना अवैध मार्गाने आणले होते. सर्व बांगलादेशी नागरिकांना खानने बनावट पारपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अजून महत्त्वाची कागदपत्रे बनवून दिली होती.ही बोरीवली पोलिसांनी जप्त केली आहेत. बांगलादेशी नागरिकांविरोधात ही या वर्षांतील सर्वात मोठी कारवाई होती. त्यानंतरही सातत्याने कारवाया सुरू आहेत. नुकतीच अवघ्या वीस हजारात अनधिकृतपणे बांगलादेशातून भारतात येण्यासाठी नागरिकांना मदत करणारी टोळीही पोलिसांनी पकडली. या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंतच बांगलादेशी नागरिकांविरोधातील मुंबई पोलिसांनी केलेली कारवाई गेल्यावर्षीपेक्षा दुपटीने अधिक असल्याचे सहपोलीस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था) सत्य नारायण चौधरी यांनी सांगितले. यावर्षी पकडण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांमध्ये बहुसंख्य नागरिक रोजगारासाठी भारतात आले होते. तसेच काही प्रकरणांमध्ये भारतात येऊन बनावट कागदपत्रांच्या साह्याने पारपत्र तयार करून परदेशात नोकरीसाठी गेल्याचेही आढळले आहे.

आणखी वाचा-रात्री गारवा, दिवसा उकाडा; मुंबईत किमान तापमान २० अंश सेल्सिअसखाली

भारतीय आधारकार्ड व पारपत्र

मुंबई पोलिसांनी यावर्षी बांगलादेशी नागरिकांविरोधात केलेल्या कारवाईत बहुसंख्य बांगलादेशी नागरिकांनी बनावट आधारकार्ड व पारपत्र बनवल्याचे आढळून आले आहे. बोरीवली पोलिसांनी केलेल्या कारवाईत सलमान नावाचा दलाल अशी कागदपत्रे तयार करून द्यायचा. अशा बनावट कागदपत्रांमुळे अनेक बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करताना अडचणी येतात. त्यामुळे बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या दलालांना पकडण्याला आम्ही प्राधान्य देत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत स्थानिक पोलिसांचे दहशतवाद विरोधी कक्ष(एटीसी), गुन्हे शाखा व राज्याचे दहशतवाद विरोधी पथक(एटीएस) काम करत आहेत.