बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय शाखेच्या १९ विद्यार्थ्यांचे प्रवेश अखेर रद्द

तुलनेत कमी गुण असताना बोगस जात व जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या आधारे जे.जे., केईएम, शीव, नायर आणि कोल्हापूर येथील नामांकित सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अनुसूचित जमातींकरिता (एसटी) राखीव जागा सहज पदरात पाडून घेणाऱ्या १९ विद्यार्थ्यांचे प्रवेश अखेर रद्द करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर बोगस प्रमाणपत्रांआधारे फसवणूक केल्याबद्दल या विद्यार्थ्यांच्या विरोधात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्याचे आदेश संबंधित महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवेश रद्द होण्याबरोबरच या विद्यार्थ्यांना सश्रम कारावास किंवा दंडात्मक शिक्षेलाही सामोरे जावे लागणार आहे. थोडक्यात गांधी, श्रीवास्तव, पारेख, रेशमवाला अशी आडनावे असलेल्या या विद्यार्थ्यांना तडवी, धोडिया, टाकनकर, भिल्ल या आदिवासींच्या जातीच्या ‘चोरी’चे प्रकरण चांगलेच भोवणार आहे.

ज्या नामांकित सरकारी  वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी विद्यार्थी कठोर मेहनत घेतात, तिथल्या जागांवर कमी गुण असतानाही केवळ बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे कसा डल्ला मारला जातो, याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केले होते. सदानंद गावित या निवृत्त सरकारी अधिकाऱ्याने मूळ आदिवासींवरील या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माहिती अधिकाराचा वापर करीत हे बिंग फोडले होते. २०१२ ते २०१५ या चार वर्षांत तब्बल १९ विद्यार्थ्यांनी बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे या जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. त्याची दखल घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने ही प्रमाणपत्रे ज्या नंदुरबार आणि नाशिक येथील जात पडताळणी समितीने दिल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला होता, त्यांच्याकडे विचारणा केली. या दोन्ही समित्यांनी ही प्रमाणपत्रे आपल्याकडून दिली गेली नसल्याचे स्पष्ट केले.

यानंतर वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने या विद्यार्थ्यांना खुलासा करण्यास सांगितले. मात्र, समाधानकारक खुलासा न आल्याने त्यांचे प्रवेश रद्द होणार आहेत, असे वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. या १९जणांवर कारवाईही होणार आहे.

बोगस प्रवेशाची केंद्रे

भायखळा येथील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात ‘जे. जे.’मध्ये नऊजणांनी असे बोगस प्रवेश मिळविले. त्याखालोखाल बोगस प्रमाणपत्राआधारे प्रवेश दिलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांत शीवचे लोकमान्य टिळक (३), कोल्हापूरचे राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालय (२), नायर दंत महाविद्यालय (२) तसेच एच.बी.टी., परळचे केईएम आणि पाल्र्याचे एच.बी.टी. (प्रत्येकी एक विद्यार्थी) यांचा समावेश आहे.  – संबंधित पान ४

खोटी जात नोंदल्यास..

किमान सहा महिने ते कमाल दोन वर्षांपर्यंतचा सश्रम तुरुंगवास किंवा किमान २ ते कमाल २० हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा.विद्यार्थ्यांला शिक्षण व नोकरीपासून वंचित करता येते.