मुंबई : गेल्या अनेक दशकांपासून मराठी रंगभूमीवरील विविध नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि नाट्य प्रयोगांचे विश्वविक्रम करणारे प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे ‘हृदयसम्राट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रशांत दामले यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट करीत या पुरस्कारासंदर्भात माहिती दिली. तसेच आयुष्यातील आनंदाच्या क्षणांपैकी हा एक क्षण असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

मराठी रंगभूमीवरील बहुमोल योगदान आणि रसिकांच्या हृदयात घर करणाऱ्या अद्वितीय कला प्रवासाबद्दल, तसेच बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या उपक्रमांप्रती योगदानाबद्दल प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ हृदयसम्राट पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ईशान्य ओहायो मराठी मंडळातर्फे ‘ बृहन्महाराष्ट्र मंडळ (बीएमएम) २०२५ मैत्री मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रशांत दामले यांना ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ हृदयसम्राट पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

‘अजून एक आनंदाचा क्षण… ‘हे विश्वची माझे घर. . . ’ नाटकानी मला काय दिलं? असं विचारलं तर, जगभरात माझ्यावर प्रेम करणारी मराठी माणसे दिली. अमेरिकेत झालेल्या कार्यक्रमात मला ‘हृदयसम्राट’ हा किताब देऊन गौरविण्यात आले. अनेक वर्ष अमेरिकेत राहूनही आपले मराठीपण जपलेल्या प्रेक्षकांनी मला सन्मानीत केले. हे केवळ आणि केवळ ‘नाटकामुळेच…’ आणि तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे…कायम ऋणी राहीन !!!’, अशी भावना प्रशांत दामले यांनी व्यक्त केली. समाजमाध्यमांवर एक पोस्ट करीत या पुरस्कारासंदर्भात त्यांनी माहिती दिली. तसेच हे सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांमुळेच शक्य झाल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून प्रशांत दामले यांना ओळखले जाते. गेल्या अनेक दशकांपासून ते नाटक, मालिका आणि चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. विशेषतः मराठी रंगभूमीवरील विविध नाटकांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले असून आजही त्यांच्या नाटकांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष बाब म्हणजे त्यांच्या नाटकांच्या प्रयोगांचे विक्रम होत असून यासाठी त्यांना ‘विक्रमादित्य प्रशांत दामले’ म्हणूनही संबोधले जाते. सध्या प्रशांत दामले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्षपदही सांभाळत आहेत.