मुंबई : पावसाळी अधिवेधनादरम्यान विधान भवनाच्या आवारात झालेल्या मारहाणप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. टकले आणि देखमुख यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायदंडाधिकारी एस. के. झंवर यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी दोन्ही आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
त्यानंतर, टकले आणि देशमुख यांच्या वकिलांनी तातडीने दोघांच्या जामीनासाठी अर्ज केला. त्याची दखल घेऊन न्यायालयाने मुंबई पोलिसांना उत्तर देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, लगेचच झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दोन्ही आरोपींना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला.
दरम्यान, विधान भवनाच्या आवारात झालेली ही मारहाणीची घटना एक पूर्वनियोजित कट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. तसेच, हा कट कुठे रचला ? यात कोण सहभागी होते ? याचा पोलीस तपास करीत आहेत. नितीन देशमुख यांना विधान भवनात येण्यासाठी आवश्यक असलेला पास कसा उपलब्ध झाला ? याबरोबरच सर्जेराव टकले पासविना आतमध्ये कसे आले ? याचीही चौकशी करत असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.