मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान केंद्र म्हणजेच ‘नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्स ॲण्ड नॅनोटेक्नॉलॉजी’मार्फत राबविण्यात येणाऱ्या एम.एस्सी. या दोन वर्षीय पूर्णवेळ अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया आणि प्रवेश परीक्षेसाठी https://muadmission.samarth.edu.in/ या संकेतस्थळावर आणि https://forms.gle/QbMMx51iCgPG65uN8 या गुगल फॉर्मवर जाऊन नावनोंदणी करणे बंधनकारक आहे.

विद्यार्थ्यांना शनिवार, १५ जूनपर्यंत नावनोंदणी करता येईल. या अभ्यासक्रमासाठी रविवार, १६ जून रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान केंद्र हे अत्याधुनिक उपकरणे, पायाभूत सुविधा आणि सुसज्ज प्रयोगशाळा असलेले मुंबई विद्यापीठातील एक प्रमुख संशोधन केंद्र म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांना अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञानाबाबत सर्वसमावेशक समज यावी यासाठी या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. बहुविद्याशाखीय दृष्टीकोनातून तयार करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमामध्ये विविध संस्थामध्ये इंटर्नशिप, कार्यशाळा आणि औद्योगिक सहकार्यांद्वारे अनुभवाधारीत शिक्षण घेण्याची संधी या केंद्राद्वारे प्रदान केली जाते.

हेही वाचा – आयएनएस ‘विक्रांत’ प्रकरण : प्रकरण बंद करण्याबाबत दाखल पोलिसांच्या अहवालावर लवकर निर्णय घ्या – उच्च न्यायालय

हेही वाचा – ‘बीएमएस’ प्रवेश कोलमडणार

या केंद्रातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या, संशोधन संस्था आणि विद्यापीठात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कार्यांतर्गत प्रशिक्षणासाठी (ऑन जॉब ट्रेनिंग) नामांकित कंपन्यांमध्ये संधी मिळू शकणार असल्याचे या केंद्राचे प्रभारी संचालक प्रा. विश्वनाथ पाटील यांनी सांगितले.