अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या बीकेसी कनेक्टर या उन्नत मार्गाची उर्वरित कामे ९ नोव्हेंबपर्यंत पूर्ण होणार असून, त्यानंतर हा मार्ग वाहतुकीस खुला होईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने जाहीर केले. पूर्व द्रुतगती मार्ग आणि वांद्रे-कुर्ला संकुल यांना जोडणाऱ्या या उन्नत मार्गामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरून वांद्रे कुर्ला संकुल गाठताना तीन किलोमीटर अंतर वाचणार आहे.
पूर्व द्रुतगती मार्गावरून शीवनजीकच्या सोमय्या मैदान येथून सुरू होणारा हा १.६ किमी लांबीचा चार पदरी उन्नत मार्ग चुनाभट्टी स्थानक, कुर्ला-सायन रेल्वे मार्ग आणि मिठी नदीवरून जात वांद्रे कुर्ला संकुलात उतरतो.
कामे अंतिम टप्प्यात : बीकेसी कनेक्टर या उन्नत मार्गावरील रस्ता दुभाजक बांधकाम, लेन मार्किंग करणे, ध्वनीरोधक यंत्रणा बसविणे, रेल्वे पुलावर संरक्षक जाळ्या बसविणे, तसेच अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी दोन्ही बाजूंना लोखंडी कमानी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले. त्यानंतर मार्ग वाहतुकीसाठी खुला होऊन पूर्व उपनगरातून वांद्रे-कुर्ला संकुलात येणाऱ्यांचा प्रवास जलद होईल, असे प्राधिकरणाने म्हटले आहे.
