मुंबई : शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थी आपापल्या नव्या, जुन्या शिक्षकांबरोबर शाळांमध्ये स्थिरावल्यानंतर आता शासनाने शिक्षकांच्या बदल्यांचा घाट घातला आहे. संवर्ग एकच्या बदल्या सुरू झाल्या असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील सूचनाही विभागाने बाजूला सारली आहे. त्याचबरोबर अनेक शाळांतील नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेतललेले शिक्षकही बदल्यांच्या यादीत असल्याने शाळांसमोरही पेच निर्माण झाला आहे.

राज्यातील शाळा सुरू होऊन महिना झाल्यानंतर आता शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदल्यांचा घाट घातला आहे. त्यामुळे शिक्षक आणि शाळा व्यवस्थासमोरही आता पेच निर्माण झाला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच शाळांविषयीचे सर्व निर्णय अंमलात येणे आवश्यक असते. शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रियाची शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होेणे गरजेचे आहे. मात्र, शाळा सुरू होण्याच्या तोंडावर, मेे महिन्यांत शिक्षण विभागाने बदल्यांची प्रक्रिया सुरू केली. मात्र, त्यानंतर संचमान्यतेचे निकष, बदल्यांबाबतचे आक्षेप अशा विविध मुद्द्यांमुळे प्रत्यक्षात अंमलबजावणी रखडली. आता ऐन शैक्षणिक वर्षात बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शिक्षण धोरणाची सोयिस्कर अंमलबजावणी

देशभरात राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासन आग्रही आहे. शिक्षण विभागाच्या प्रत्येक निर्णयात शिक्षण धोरणाचे दाखले दिले जातात. मात्र, शिक्षण विभागाचा धोरण अंमलबजावणीचा हा सोस ठराविक मुद्द्यांबाबतच असल्याचे दिसत आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या बदल्या करण्यात येऊ नयेत, असे धोरणात सुचवण्यात आले आहे. मात्र, शिक्षण विभागाने ही सूचना बाजूला सारली आहे.

प्रशिक्षित शिक्षकांच्याही बदल्या यंदा पहिलीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यानुसार शिक्षकांना नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणे झाली त्यावेळी बदल्यांबाबत स्पष्ट सूचना नसल्याने शाळांनी त्यांच्याकडील शिक्षक सोयीने प्रशिक्षणासाठी पाठवले. आता प्रशिक्षण घेऊन आलेल्या शिक्षकांचीही नावे बदल्यांच्या यादीत आहेत. त्यामुळे पहिलीच्या वर्गाला प्रशिक्षित शिक्षक मिळतीलच याची खात्री देता येणार नाही, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले. असे झाल्यास प्रशिक्षण कार्यक्रमावर केलेला लक्षावधी रुपयांचा खर्च वाया जाणार. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर बदल्या करण्यात येणार असल्याने शिक्षकांच्या मानसिकतेवर आणि अपरिहार्यपणे शैक्षणिक कामकाजावर गुणवत्तापूर्ण शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होत आहेत, असेही शिक्षकांचे म्हणणे आहे.

आमच्या मुलांचे काय?

बदल्या झाल्यानंतर शिक्षकांनी दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागेल. शिक्षकांच्या मुलांचेही प्रवेश ते सध्या कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये झाले आहेत. आता होणाऱ्या बदल्यांमुळे शिक्षकांच्या कुटुंबालाही मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे. दहावी, बारावीच्या वर्गात शिकणारी मुले असलेले शिक्षक, शिक्षकांचे वृद्ध पालक अशा अनेक कौटुंबिक गोष्टी सांभाळाव्या लागणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू असताना बदल्या करण्याऐवजी उन्हाळी सुट्टीत प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.