गेल्या जवळपास १५ दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आर्यन खानचा तुरुंगवास अद्याप संपायची चिन्ह दिसत नाहीयेत. बुधवारी एनडीपीएसच्या विशेष न्यायालयानं आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यानं वकिलांमार्फत तातडीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. तसेच, यासंदर्भातली सुनावणी तातडीने घ्यावी, अशी मागणी देखील करण्यात आली. मात्र, न्यायालयानं त्याच्या जामीन अर्जावर सुनावणीसाठी पुढची तारीख दिल्यामुळे त्याचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. उद्या किंवा सोमवारी सुनावणी घेतली जावी, अशी मागणी आर्यननं केली असता न्यायालयानं मात्र थेट मंगळवारी सुनावणीची तारीख दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज न्यायालयात आर्यन खानच्या याचिकेवर तातडीने सुनावणीची मागणी त्याचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केली. उद्या किंवा सोमवारी ही सुनावणी घेतली जावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. मात्र, यावेळी न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी मंगळवार २६ ऑक्टोबरची तारीख दिली आहे. दरम्यान, आर्यन खानसोबतच मुनमुन धामेचानं दाखल केलेल्या जामीन याचिकेवर देखील मंगळवारीच सुनावणी होणार आहे.

NDPS च्या विशेष न्यायालयानं बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे आता थेट उच्च न्यायायात जामिनासाठी अर्ज करण्याशिवाय पर्याय नव्हता. विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर काही वेळातच आर्यनच्या वकिलांनी त्याच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर बुधवारीच याचिका सादर करण्यासाठी आर्यनच्या वकिलांनी प्रयत्नही केला. मात्र ते शक्य होऊ न शकल्याने याचिका गुरुवारी सादर करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aryan khan bail plea hearing on tuesday in bombay high court cruise drugs party case pmw