मुंबईः सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन दिवस केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत सहा कोटी ४१ लाख रुपयांचे अमली पदार्थ व सोने जप्त केले. ३ ऑगस्ट व ४ ऑगस्ट रोजी केलेल्या दोन कारवायांमध्ये दोन व्यक्तींना अटक करण्यात आली. याप्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे.

सीमाशुल्क विभागाने ३ ऑगस्ट रोजी केलेल्या कारवाईत मेणात लपवून सोन्याच्या तस्करीत मदत करणाऱ्या विमानतळावरील कर्मचाऱ्याला अडवले. एका प्रवाशाने या कर्मचाऱ्याला मेणाचे तुकडे विमानतळाबाहेर नेण्यासाठी दिले होते. तपासणी त्या मेणामध्ये १५१० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड सापडली. त्याची किंमत एक कोटी ३९ लाख रुपये आहे. सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने त्याला अटक केली. आरोपीविरोधात सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत बँकॉकहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेत लपवून ठेवलेला सुमारे ५०२७ ग्रॅम वजनाचा हिरव्या रंगाचा संशयीत पदार्थ सापडला. तपासणीत तो हायड्रोपोनिक गांजाचा असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडील बॅगेमध्ये प्लास्टिक पिशवीत लपवून गांजाची तस्करी करण्यात येत होती. त्या आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत पाच कोटी रुपये आहे. या दोन्ही प्रकरणांमागे आंतरराष्ट्रीय तस्कराच्या टोळीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत सीमाशुल्क विभाग अधिक तपास करीत आहे.

पर्यटनाच्या नावाखाली गांजा तस्करी

दक्षिण अमेरिका खंडातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची निर्मिती करण्यात येते. त्यानंतर विविध मार्गांनी जगभरात त्याचे वितरण करण्यात येते. गेल्या काही महिन्यांपासून बँकॉक मार्ग मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतातून थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे जाणे-येणे असते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात विमानांची ये-जा असते. परिणामी, बँकॉकमार्गे भारतात गांजाची तस्करी करण्यात येत आहे. ६ महिन्यांत १०० कोटींहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या तस्करीत थायलंडमधील भारतीय तस्करांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे.