बकैती म्हणजे बकबक करणे… वायफळ बडबड करणे. आपल्या देशाचा मजबूत कणा असलेला मध्यमवर्ग आयुष्यातील अर्धाअधिक काळ या बकैतीत घालवतो. हाती दोन पैसे आणि डोक्यावर छप्पर असलं की त्याची स्वप्नांची बकैती सुरू होते. आणखी मोठी स्वप्नं बघून मग त्यासाठी कष्ट करण्याचं स्फूरण चढतं. आणि ते कष्ट वाढत्या पैशांच्या गरजेपुढे तोकडे पडले की मग ती स्वप्नं वाकवून ‘टेलरमेड’ करण्याचं कसब या वर्गाला परिस्थितीने शिकवलेलं असतं. अशाच मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा म्हणजे बकैती.
गाझियाबादमध्ये राहणाऱ्या कटारिया कुटुंबाची ही कथा आहे. कुटुंबप्रमुख संजय कटारिया (राजेश तेलंग) हा पेशाने वकील आहे. पत्नी सुषमा (शीबा चढ्ढा) च्या मदतीने संसाराचा गाडा तो हाकत असतो. वकिली चालत नसते म्हणून नोटरी करत असतो. या चौकोनी कुटुंबाचे आणखी दोन खांब म्हणजे दोन गोंडस मुलं. अभ्यासात हुशार नैना ऊर्फ नोनू (तान्या शर्मा) आणि अभ्यासात ढ, पण खेळात हुशार भरत ऊर्फ बंटी (आदित्य शुक्ला). कटारिया कुटुंबाच्या आयुष्यातला आर्थिक संघर्ष आणि त्याभोवती घडणाऱ्या लहान-लहान गोष्टींची ही मालिका निखळ, कौटुंबिक मनोरंजन करते. चौघांनीही उत्तम अभिनयाने मालिका प्रेक्षणीय केली आहे. संजय कटारियाच्या लहान भावाचा उद्याोग असल्याने त्याची परिस्थिती तुलनेने चांगली असते. त्याच्याकडे वडिलोपार्जित व्यवसाय असतो, तर मोठ्या भावाकडे वडिलोपार्जित घर असतं. नेहमीची भावकीची भांडणंही असतात.
वाढत्या घरखर्चाला तोंड देण्यासाठी नवनव्या युक्ती, त्यातील फसगत, शिक्षणाच्या खर्चाच्या समस्या आणि भावा-भावांच्या, भावा-बहिणींच्या नात्यातील रुसवेफुगवे अशी सरमिसळ असलेली, शांत, साधी, कौटुंबिक वेबमालिका पाहण्यातला आनंद ‘बकैती’ भरभरून देते.
‘नव्या जमान्यात’, सोशल मीडियाच्या काळात असं म्हणू हवं तर, ‘एम्पथी क्रायसिस’ वाढू लागले असल्याचं समाजशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. सहानुभूती हरवत निघालेली आहे. लोक विशेषत: कोविडनंतर आपल्या कोषात राहू लागले आहेत. स्वार्थापलीकडे नात्यांना खोली उरलेली नाही, माणसामाणसांतील सहानुभूती हरवत चालली आहे का असे वाटावे अशा घटना आसपास घडतात, अनुभव कुटुंबात येतात, असे अनेकजण सभोवती म्हणत असतात. अशा परिस्थितीमुळे ‘बकैती’सारख्या मालिकांमधून आपल्या आजुबाजूचे निसटते बंध माणसं शोधू पाहतात. आणि ओटीटीवरच्या रक्तरंजित, रहस्यमय मालिकांच्या गर्दीत हलक्याफुलक्या वेबमालिका भाव खाऊन जातात.
एखाद्या शैलीतील मालिका किंवा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला की त्याच पठडीतल्या मालिकांची रेलचेल सुरू होते. सोनी लिव्हवर ‘गुल्लक’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. बकैती ही त्याच पठडीतील आहे. अगदी २०-२० मिनिटांचा एक एपिसोड आहे. त्यामुळे हलक्याफुलक्या मनोरंजनासाठी बकैतीची बकबक ऐकायला काहीच हरकत नाही.
बकैती
दिग्दर्शक – अमित गुप्ता
कलाकार – राजेश तेलंग, शीबा चढ्ढा, आदित्य शुक्ला, तान्या शर्मा
ओटीटी – झी फाइव्ह